मीरा भाईंदर- शहरातील व्यायामशाळा सुरू करण्यास मनपा प्रशासनाने परवानगी दिली आहे. आजपासून सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तब्बल सात महिन्यानंतर व्यायामशाळा सुरू होत असल्यामुळे व्यायामशाळा चालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोरोना महामारीमुळे अनेक व्यवसायांवर परिणाम झाला आहे. टाळेबंदीमध्ये शिथिलता आल्यानंतर अनेक गोष्टींना राज्य सरकारने परवानगी दिली. मात्र व्यायामशाळा बंद असल्यामुळे व्यायामशाळा चालकांवर उपासमारीची वेळ आली. त्यामुळे व्यायामशाळा सुरू करण्याची मागणी अनेक संघटनांनी केली. मात्र कोरोना प्रार्दुभाव वाढत असल्यामुळे परवानगी देण्यात आली नाही. मीरा भाईंदर मनपा प्रशासनाने परिपत्रक काढून सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत परवानगी दिली आहे. तब्बल सात महिन्यांनंतर व्यायामशाळा सुरु झाल्यामुळे व्यायामशाळा चालक तसेच व्यायाम करणाऱ्या नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
गेल्या सात महिन्यापासून आम्ही घरी बसून आहोत, आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे, संघटनेच्या वतीने आम्ही राज्यसरकार तसेच मनपा प्रशासनाला पत्र देऊन भेट घेऊन विनंती केली. अखेर आमच्या मागणीला यश आले.आमच्यासाठी खुप आनंदाची बातमी आहे मीरा भाईंदर शहरात २०० पेक्षा अधिक व्यायामशाळा आहेत. व्यायामशाळा सुरू झाल्यामुळे आम्हाला एक धीर मिळाला आहे अशी प्रतिक्रिया पश्चिम ठाणे शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष सचिन डोंगरे यांची व्यक्त केली.