ठाणे - उल्हासनगरमधील एका अपघातग्रस्त टेम्पोला मदत पुरवण्यासाठी कंट्रोल रूममधून विठ्ठलवाडी पोलिसांना कॉल आला होता. यावर विठ्ठलवाडी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून चाणाक्षपणे केलेल्या तपासात तब्बल साडेसहा लाख रुपये किंमतीचा प्रतिबंधित गुटखा त्या टेम्पोमधून जप्त करण्यात आला आहे.
उल्हासनगर शहरात सरेआम गुटखा विक्री सुरू आहे. हा गुटखा भिवंडी येथून बंद टेम्पोतून आणला जातो. दुपारी पेन्सिल फॅक्टरी येथील विठ्ठल मंदिराजवळ एक टेम्पो अपघातग्रस्त झाल्याचा कॉल कंट्रोल रुममधून विठ्ठलवाडी पोलिसांना आला. पोलीस उप निरीक्षक मंगेश जाधव, पोलीस कॅान्स्टेबल सुनील रसाळ, राजेश डोंगरे, पोलीस हवालदार शितल माने, विनोद कदम हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अपघातग्रस्त टेम्पोची तपासणी केली असता टेम्पो (एमएच ४ जेके ५६३१) मधून खाकी रंगाच्या १५ गोण्या होत्या. या गोण्यांमध्ये असलेला गोवा आणि विमल गुटखा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
जप्त केलेल्या प्रतिबंधित गुटख्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला पुढील कारवाईसाठी देण्यात आली असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भामे यांनी सांगितले आहे.