ठाणे - पोलिसांनी सोनसाखळी चोरट्यांवर धडक कारवाई करून सूत्रधारांना आणि टोळीप्रमुखांना गजाआड केल्यानंतर सोनसाखळीच्या घटनांना आळा बसला होता. त्यानंतर लॉकडाऊनमुळे आणि नाकाबंदी यामुळे नागरिक कामाशिवाय घरातून बाहेर पडत नसल्याने चोरट्यांनी पंचाईत झाली होती. दरम्यान आता लॉकडाऊन शिथील केल्याने पुन्हा सोनसाखळी चोरटे हे वृद्धांना टार्गेट करीत सोनसाखळी हिसकावून नेण्याच्या घटना समोर येत आहेत. राबोडीत ७५ वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील ६० हजाराची सोनसाखळी खेचून चोरटयांनी पोबारा केल्याची घटना घडली आहे.
आरोपीला अटक
राबोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत भाजीपाला घेऊन वृद्ध महिला घरी परतत होती. तेव्हा आरोपी अमित हिंदुराव कदम (३०) याने महिलेच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून गळ्यातील सोनसाखळी चोरली. या सोनसाखळीची किंमत ६० हजार रुपये आहे. या प्रकरणी वृद्धेने राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे सोनसाखळी चोरटा वृध्दाच्या इमारतीच्या लिप्टपर्यंत पोहचला. त्याने लिप्टमध्ये चढताना सोनसाखळी खेचून पोबारा केला. पोलीसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून सोन्याची चैन हस्तगत करण्यात आली आहे.