ठाणे - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यंदा बकरी ईद सणानिमित्ताने भरणारे बकरी बाजार बंद करून बकऱ्यांची ऑनलाईन विक्री करण्याचे आदेश 27 जुलैला राज्य सरकारने काढले. त्यामुळे बहुतांश बकरी मंडईत कुर्बानीचे बकरे खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे बकरे विक्रेत्यांनी ऑनलाइन बकरे विक्री सुरू केली आहे. मात्र, बकरी मंडई बंद असल्याने कुर्बानीचे बकरे ठेवायचे कुठे? असा प्रश्न बकरे विक्रेत्यांना पडला आहे.
कोरोनाच्या महामारीमुळे देशभरातील धार्मिक स्थळे अद्यापही बंदच आहेत. त्यातच गेल्या मार्च महिन्यापासून लॉकडाऊनच्या काळात सर्वच धर्मियांचे सण उत्सव घरच्या घरी साजरे होत असतानाच यंदाच्या बकरी ईद निमित्ताने राजकीय वातावरण तापल्याचे पहावयास मिळत आहे. त्यातच ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी बकरी मंडीई कल्याण-भिवंडी मार्गावरील कोनगावात असून या बकरी मंडईत प्रत्येक बकरी ईद निमित्ताने बकऱ्यांच्या खरेदी विक्रीतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. मात्र, यंदाच्या बकरी ईदला खरेदी-विक्रीला ब्रेक लागला असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन बकरे विक्रीसाठी शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसापासून कोनगावच्या बकरी मंडईत दरदिवशी 100 ते 150 कुर्बानीच्या बकऱ्यांची ऑनलाईन खरेदी होत असल्याचे येथील व्यापारी इलियास शेख यांनी सांगितले, तर 10 हजारांपासून ते 35 हजारापर्यंतच्या बकऱ्यांची आतापर्यंत ऑनलाईन विक्री केली आहे.
मुस्लीम बांधवांचा पवित्र बकरी ईद हा सण तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यातच गेल्या आठवडाभरापासून यावर राजकीय वातावरण तापले असतानाच मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन बकऱ्यांची वाहतूक सुरू केल्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी काल जाहीर केले. तरीदेखील आजही बकऱ्यांची वाहतूक करणारी वाहने पोलिसांकडून अडवली जात असल्याचा आरोप बकरी मंडईचे पदाधिकारी इलियास भाई यांनी केला आहे.
'अशी' होते बकऱ्यांची ऑनलाइन विक्री -
ऑनलाइन बकरे विक्रीसाठी पसंत असलेल्या बकऱ्यांना दाखवण्यासाठी व्हाट्सअप व्हिडिओ कॉलिंगचा वापर केला जातो. त्याचे इलेक्ट्रॉनिक काट्यावर वजन करण्यात येते. त्यानंतर त्या बकऱ्याची किंमत ठरवून ग्राहकांना बकरा पसंद पडला तर त्या बकऱ्यांची ऑनलाइन रक्कम जमा केली जाते. त्यानंतर तो बकरा त्यांच्या घरापर्यंत पोहोचवला जातो, तर दुसरीकडे ऑनलाइन व्यवसाय करणाऱ्या इतर व्यावसायिकांकडे मोठ-मोठी दुकाने गोदामे आहेत. त्यामुळे त्यांना ऑनलाइन साहित्याची विक्री परवडते. मात्र, आमच्याकडे बकरे ठेवण्यासाठी पर्याय नसल्याने किमान सरकारने याकडे लक्ष द्यावे. तसेच पोलिसांकडून होणारी पिळवणूक थांबवावी, अशी मागणी यावेळी कोनगाव बकरी मंडईच्या विक्रेत्याकडून करण्यात आली आहे.