ठाणे - २१ वर्षीय प्रियकराला नदीच्या पाण्यात बुडताना पाहून त्याच्या १९ वर्षीय प्रेयसीनेही त्याला वाचविण्याच्या नादात पाण्यात उडी घेतली. मात्र, खोल पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचाही पाण्यात बुडून अंत झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. कल्याण तालुक्यातील आपटी गावाच्या हद्दीत असलेल्या उल्हास नदीच्या बंधाऱ्यानजीक ही घटना घडली आहे. याप्रकरणी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
दीपेश वालजी परमार (२१, रा. धोबीघाट , उल्हासनगर ) आणि गुंजन लंबाना (वय, १८, रा. पंजाबी कॉलनी उल्हासनगर), असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या तरुण-तरुणीचे नावे आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशासह राज्यात लॉकडाऊन आणि संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. असे असतानाही दीपेश आणि गुंजन काही मित्रांसोबत कल्याण तालुक्यातील आपटी गावानजीक असलेल्या उल्हास नदीच्या बंधाऱ्यावर शुक्रवारी दुपारच्या सुमारास फिरायला गेले होते. त्यावेळी दीपेश हा नदी पात्रात पडला. मात्र, त्याला नदी पात्रातील खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडत असल्याचे पाहून गुंजननेही त्याला वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मात्र, दोघांना नदी पात्रातील खोल पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचा बुडून मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच कल्याण तालुका गोवेली पोलीस चौकीत कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक प्रदीप आरोटे हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. गावकऱ्यांच्या मदतीने त्या दोघांचे मृतदेह नदी पात्रातून बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात रवाना केले.
दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील काही भागात लॉकडाऊन व संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे. मात्र, याचा गैरफायदा घेत काही महाभाग विनाकारण नदीवर फिरण्यासाठी आणि आंघोळीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसत आहे. त्यामुळे असे प्रकार घडत असल्याची माहिती स्थानिक गावकऱ्यांनी दिली आहे.