ठाणे - लाखो नागरिकांची तहान भागविणाऱ्या बदलापूर नजीकच्या बारवी धरणासह मुरबाड नदीतील माशांच्या पोटात धाग्याच्या आकाराचे लाल, पांढऱ्या रंगाचे जंतू असल्याचे आढळले. मात्र, या घटनेमुळे मासे खाणाऱ्या खवय्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहवयास मिळाले आहे.
४ ते ६ इंच लांबीचे व लाल, पांढऱ्या रंगाचे जंतू
ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, मीरा-भाईंदर या महापालिका क्षेत्रासह ग्रामीण भागातील एक कोटी नागरिकांची तहान भागवणारे बारवी धरण व मुरबाड नदीतील गोड्या पाण्यातील मासे हे गेली दोन वर्षांपासून एका वेगळ्याच जंतू संसर्गाने ग्रस्त असल्याचे दिसून आले आहे. बहुतांश माशांच्या पोटात सुमारे ४ ते ६ इंच लांबीचे व रंगाने लाल, पांढऱ्या दोऱ्याच्या आकाराचे जंतू या माशांच्या शरीरात घर करुन राहत असल्याचे आढळून आले.
मासे विक्रेते व ग्राहकांमध्ये जंतूमुळे वाद
धरण व नदीच्या गोड्या पाण्यातील मासे विक्री करणारे विक्रेते व ग्राहकांत या जंतूमुळे नेहमी वाद निर्माण होत आहेत. यामुळे असे माशांकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे मासे विक्रेता आर्थिक संकटात सापडला आहे. या जंतूंचे निदान, योग्य विल्हेवाट व नाश होण्यासाठी सरकारी यंत्रणा व मत्स्यपालन संस्थेशी सतत संपर्क व पाठपुरावा स्थानिक समाजसेवक अनिल सकट यांनी केल्याने हा प्रकार उघडकीस आला.
तपासणी व निरिक्षणासाठी मत्स्य जीवशास्रज्ञांकडे जंतूसह ताजे मासे
मत्स्य व्यवसायच्या संबधित अधिकाऱ्यांबरोबर अनिल सकट यांनी चर्चा केल्यानंतर मत्स्य व्यवसाय ठाणे-पालघर विभागचे सहायक आयुक्त आनंद पालव यांच्या सूचनेनुसार मत्स्य विभागातील सहायक मत्स्य व्यावसायिक विकास अधिकारी क्रुणाली तांडेल, मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी अजिंक्य देवकते यांनी बारवी धरणातील मासेमारीच्या जागेवर जावून विविध प्रकारच्या माशांच्या पोटातील जंतूसह ताजे नमूने तपासणीसाठी व निरिक्षणासाठी मत्स्य जीवशास्रज्ञ यांच्याकडे दिले आहेत. तर दुसरीकडे स्थानिकांकडून बारवी धरण व्यवस्थापनाद्वारे वेळोवेळी या पाण्याची तपासणी करावी, अशीही मागणी होत आहे.