ठाणे - कळव्यातील घोळाईनगर येथे गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना आज सायंकाळी घडली. या घटनेत आश्लेषा सुभाष काळे (वय १६) ही किरकोळ जखमी झाली आहे. मात्र, या स्फोटात दोन घरांचे नुकसान झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे.
हेही वाचा - 'पोलीस तुमच्या दारी, तुमचे संरक्षण आमची जबाबदारी'; उपक्रमाला सुरुवात
कळवा, घोळाईनगर मधील अहिल्यादेवी चाळीत राहणारे सुभाष काळे यांच्या घरात गॅस गळती होऊन आग लागली. त्यानंतर अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. यामध्ये काळे आणि अरुण आयवले यांच्या घराचे नुकसान झाले. घरात एकटी असलेली आश्लेषा काळे ही जखमी झाली असून तिच्या चेहऱ्याच्या उजव्या बाजूला आणि डाव्या हाताला दुखापत झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिका अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, महावितरण आणि कळवा पोलिसांनी धाव घेतली. यावेळी १ फायर वाहन, २ रेस्क्यू वाहन घटनास्थळावर गेले होते. गॅस गळती झाल्यानंतर आग नेमकी कशामुळे लागली, हे सांगता येत नसून स्फोटात दोन घरांचे नुकसान झाल्याची माहिती कक्षप्रमुख संतोष कदम यांनी दिली. ब्लास्ट झालेला भाग हा डोंगराळ असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आहे. ज्या घरात ब्लास्ट झाला त्याच्या बाजूच्या घरातही लोक राहतात. ब्लास्ट झाल्याने ते घरातून बाहेर पडले.
हेही वाचा - अल्पवयीन मुलीवर अत्याचाराप्रकरणी नराधमास दहा वर्षाचा सश्रम कारावास