नवी मुंबई - सार्वजनिक उद्याने फक्त लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि नागरिक यांच्यासाठी राखीव असतात, त्यामुळे या उद्यानात कोणत्याही प्रकारचे राजकिय व इतर कार्यक्रम करण्यासाठी परवानगी नसते. मात्र, नवी मुंबईतील उद्यानात चक्क राजकीय नेत्यांच्या माध्यमातून कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. नागरीकात या संबंधी नाराजी असूनही सर्वसामान्य नागरिक राजकीय नेत्यांच्या भीतीने प्रतिक्रिया व्यक्त करण्यासही घाबरत आहेत.
नवी मुंबई शहरात पुढील महिन्यात महानगरपालिका निवडणुका होत आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवार कंबर कसून पुढे येत आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी हळदी कुंकू व खेळ पैठणीचा असे कार्यक्रम रंगत आहेत. यासाठी वाटेल त्या ठिकाणी हे कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून नवी मुंबईतील नेरूळ सेक्टर 21 मध्ये आज लहान मुले ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी राखीव असणाऱ्या उद्यानात अशाचं एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. हा कार्यक्रम आज संध्याकाळी होत असून या उद्यानात रेड कार्पेट स्टेज बांधण्याचे काम सुरू आहे. या कार्यक्रमात बेलापूर मतदार संघाच्या आमदार मंदा म्हात्रे व ऐरोली मतदार संघाचे आमदार गणेश नाईक सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम भाजपच्या वतीने आयोजित केला आहे. लहान मुलांसाठी खेळण्याचे उद्यानात हा कार्यक्रम होत असून या कार्यक्रमाला परवानगी महानगरपालिकेच्या माध्यमातून दिल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. मात्र, घाबरून कोणीही पुढे येऊन बोलण्यात तयार होत नाही. हा कार्यक्रम स्थायी समितीच्या माजी सभापती प्रभाग क्रमांक 91 च्या नगरसेविका नेत्रा शिर्के यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे.