ठाणे - उत्तर प्रदेशमधील कुख्यात गुंड विकास दुबेचे दोन साथीदार अरविंद त्रिवेदी उर्फ गुड्डण रामविलास त्रिवेदी आणि सुशील कुमार उर्फ सोनू सुरेश तिवारी या दोघांना शनिवारी ठाण्यातून अटक करण्यात आली. त्यांना रविवारी ठाण्याच्या विशेष सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायाधीश रश्मी झा यांनी दोघा आरोपींना 21 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. मात्र, या दोन्ही आरोपींना आपलाही एन्काऊंटर होईल, अशी भीती वाटत आहे. त्यामुळे आपल्याला एअरलिफ्ट करुन उत्तर प्रदेशला न्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
विकास दुबे आणि त्याच्या साथीदाराचा एन्काऊंटर झाल्यामुळे त्याचे दोन साथीदार उत्तर प्रदेश सोडून ठाण्यात आले. मात्र, दोघेही महाराष्ट्र एटीएसच्या जाळ्यात अडकले. अटक केलेल्या या दोघांना आता आपलाही एन्काऊंटर होईल, अशी भीती वाटत आहे. म्हणून आपल्याला उत्तर प्रदेशला घेऊन जाताना वाहनाने न नेता हवाई मार्गाने न्यावे, अशी मागणी त्यांनी ठाणे न्यायालयात केली आहे. आरोपींचे वकील अनिल जाधव यांनी ठाणे न्यायालयात एका लेखी अर्जाद्वारे ही मागणी केली.
सध्या दोघांना तळोजा तुरुंगात ठेवण्यात येणार आहे. तेथे त्यांची कोरोना चाचणी केली जाईल. त्यानंतर या दोघांचा ताबा उत्तर प्रदेश पोलिसांना दिला जाणार असल्याची माहिती एटीएसचे पोलीस निरीक्षक दया नायक यांनी पत्रकारांना दिली.
उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये झालेल्या आठ पोलीस कर्मचाऱ्यांच्या हत्या प्रकरणात विकास दुबे हा मोस्ट वॉन्टेड होता. त्याचा चकमकीत खात्मा झाल्यानंतर त्याचे साथीदार फरार झाले होते. यातील दोघे ठाण्यात लपल्याची माहिती दया नायक यांना मिळाली होती. शनिवारी सकाळी ठाण्यातील कोलशेत-ढोकाळी परिसरातील एका चाळीतून दोघांना नायक व त्यांच्या पथकाने अटक केली होती.