ठाणे - गँगस्टर सुरेश पुजारी याचे खंडणीसाठी व्यापारी व राजकारण्यांना धमकीचे सत्र सुरूच असल्याचे पुन्हा समोर आले आहे. आता तर उल्हासनगरमधील कल्पतरू बँकेचे चेअरमन तथा मेडिकल एजन्सीचे मालक अमित वाधवा (वय ४४) यांना १ कोटींच्या खंडणीसाठी धमकीसाठी फोन आला होता. जर तू १ कोटी देऊ शकत नाही तर तुझ्या बँकेतून माझ्या चार साथीदारांनी कर्ज घेतले आहे, ते कर्ज व्याजासह माफ कर नाही तर, तुला ठार मारले जाईल असे अनेक वेळा धमकीचे गँगस्टर सुरेश पुजारीने विदेशातून फोन करत आहे. त्याच्या धमक्याचे फोन सतत येत असल्याने अखेर अमित वाधवा यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गँगस्टर सुरेश पुजारीसह त्याच्या चार साथीदारांवर खंडणीसह विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. रोशन माखिजा, उमेश राजपाल , पंकज तिलोकानी , (तिघेही रा. उल्हासनगर ) आणि सुशील उदासी (रा. ठाणे ) असे गँगस्टर सुरेश पुजारीसह गुन्हा दाखल झालेल्या चारही आरोपींचे नावे आहेत.
हेही वाचा - सिंधुदुर्ग व गोव्यात हायअलर्ट; किनारी भागात वाहू लागले जोरदार वारे
यापूर्वीही अनेक व्यापारी, बांधकाम व्यावसायिकांसह राजकारण्यांना धमकी
गँगस्टर सुरेश पुजारी हा विदेशात बसून ठाणे, रायगड जिह्यातील व्यापारी, बांधकाम व्यावसायीकांसह राजकारण्यांना धमकावून खंडणी वसूल करीत आहे. यापूर्वी अशीच धमकी त्याने कळव्याचे आमदार तथा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना दिली होती. या बाबत जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्याना पत्र लिहून आपल्याबाबत कोणतीही अप्रिय घटना घडल्यास त्याला आपण जबाबदार असल्याचे म्हटले होते. दोन वर्षांपूर्वीही कल्याण पश्चिमेकडील गांधारी माधव संकल्पच्या मागील बाजूस असलेल्या काशीष पार्कमध्ये राहणारे भास्कर शेट्टी या कँटीन व्यावसायिकाला याच गँगस्टर पुजारीने धमकावले होते. शेट्टी यांना फोन करणाऱ्याने आपण सुरेश पुजारी बोलत असल्याची ओळख दिली. बऱ्या बोलाने 25 पेट्या टाक, नाहीतर ढगात पाठवीन अशी जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणीची मागणी केली. या प्रकारामुळे शेट्टी यांनी दरारून घाम फुटला. खडकपाडा पोलिस ठाण्यात या प्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापाठोपाठ कल्याणचे आमदार गायकवाड यांनाही त्याने अशाच पद्धतीने धमकावल्याने राजकीय, तसेच केबल व्यावसायिक मंडळींचे धाबे दणाणले होते. त्यावेळी ठाणे खंडणी पथक प्रमुख प्रदीप शर्मा आणि आमदार गायकवाड यांच्यात चागंलाच वाद विवाद रंगला होता.
कोण आहे हा गँगस्टर?
सुरेश पुजारी हा काही वर्षांपूर्वी उल्हासनगरमध्ये व्हीडिओ गेम चालवत होता. तर, अंबरनाथमध्ये पत्त्याच्या क्लबमध्येही कामाला होता. उल्हासनगर मधील विश्वास ढाब्यावर नोकरीही करत होता. त्यानंतर तो घाटकोपर येथील असल्फा व्हिलेज येथे राहात होता. तेथूनच त्याने गुन्हेगारी सुरू केली होती. साद्या तो विदेशात लपून बसल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी उल्हासनगर 2 येथील सच्छिदानंद केबल व्यवसायिकावर त्याच्या शूटरने गोळ्या झाडल्याची घटना सीसीटीव्ही कैद झाली होती. तर उल्हासनगरचे बांधकाम व्यवसायिक सुमित चक्रवर्ती यांना देखील सुरेश पुजारीने धमकीचा फोन केला होता. त्यावेळी सुमित चक्रवर्ती यांच्या मुलाने फोन उचलत सुरेश पुजारीला सुनावले होते. हिम्मत असेल तर समोर येऊन बोल, असे याच गँगस्टर पुजारीला खुले आव्हान दिले होते. असाच प्रकार तत्कालीन राष्ट्रवादीचे नगरसेवक व आता टीम ओमी कलानीमध्ये असलेल्या नगरसेवकाच्या बाबतीत घडला होता. या नगरसेवकाने सुरेश पुजारी यास सुनावले होते की "तु मला ओळखत नसशील पण मी तुला ओळखतो' तू उल्हासनगर येथील मंदाताईच्या ढाब्या वर कामाला होतास"असे सांगत सुरेश पुजारीची इज्जत काढली होती.
हेही वाचा - अक्षय तृतीयेनिमित्त दगडूशेठ गणपतीला 1,111 हापूस आंब्यांची आरास