ठाणे- दुसऱ्याच्या नावाने दुचाकी खरेदीचे बनावट कागदपत्र तयार करून त्या दुचाक्यांची ओ एल एक्स मोबाईल अॅपवर जाहिरात करून परस्पर विक्री करणाऱ्या चार जणांच्या टोळीला भिवंडी शहर पोलिसांनी गजाआड केले आहे. सरफराज अब्दुल रहमान शेख (वय 21 रा. बारक्या कंपाऊंड) आरिफ सिराज अन्सारी (वय 30 रा. माडा कॉलनी) अंवर अमिन शेख (वय 21 रा. माडा कॉलनी) मजिद मधील अहमद शेख (वय 40 रा. शास्त्रीनगर) अशी अटक केलेल्या भामट्या आरोपींची नावे आहेत. या भामट्याकडून 26 दुचाक्या हस्तगत केल्या आहेत.
खळबळजनक बाब म्हणजे या आरोपींकडे दुचाकी विक्रीचा कुठलाही परवाना नसताना भिवंडीतील माडा कॉलनी परिसरात एका चप्पल विक्रीच्या दुकानात मुसाफिर मोटर्स या नावाने दुचाकी विक्रीचे शोरूम उघडले होते. या भामट्यांनी बहुतांश दुचाकी खरेदी करणाऱ्या लोकांकडून दुचाकी खरेदीबाबत रोख रक्कम घेऊन त्यांची फसवणूक केल्याचेही उघडकीस आले आहे.
अशीच एक फसवणूक झालेले अब्बूसामा बद्री आलम अंसारी यांनी ओएलएक्स अॅपवर दुचाकी विक्रीची जाहिरात पाहिली होती. त्यानंतर त्यांनी या भामट्याशी संपर्क केला. तर त्यांना दुचाकीचे मालक बँकेचे कर्ज फेडू न शकल्याने ही दुचाकी आम्ही खरेदी केल्याची थाप मारली. त्यानंतर या दुचाकीचा 35 हजार रुपयात व्यवहार केला. त्यापैकी 28 हजार रुपये या भामट्यांना देऊन सात हजार रुपये वाहन नोंदणी झाल्यानंतर देण्याचे ठरले होते. मात्र पैसे देऊनही दुचाकी आपल्या नावावर होत नसल्याचे पाहून फिर्यादीने भामट्यांशी मोबाईल वर संपर्क साधला असता मोबाईल स्विच ऑफ असल्याचे वारंवार आढळून आले.
दरम्यान, अबू सामा अन्सारी यांनी पुन्हा ओएलएक्स अॅपवर दुचाकीच्या विक्रीची जाहिरात पाहून विक्री करणाऱ्याशी संपर्क साधला असता अगोदरची दुचाकी विकणारे हे तेच भामटे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात दुचाकीच्या खरेदीच्या व्यवहारात फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यांच्यावर गुन्हा दाखल करीत या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय कांबळे व पोलीस उपनिरीक्षक शरद बरकडे यांच्यासह पथकाने शिताफीने तपासाची चक्रे फिरवीत या चौघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.