ठाणे - राज्यात आलेल्या महापुराने खूप मोठी हानी झाली असून पूरग्रस्तांना सध्या मदतीची गरज आहे. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांनी पूरग्रस्त भागात शक्य होईल तितकी मदत करावी अशी अपेक्षा ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी व्यक्त केली. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ १ आणि ५ च्या वतीने मंगळवारी 'श्री विघ्नहर्ता पुरस्कार 2018' चे आयोजन ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात करण्यात आले, त्यावेळी आयुक्त फणसळकर बोलत होते. याप्रसंगी ठाणे, कळवा, मुंब्रा परिसरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
कोल्हापूर, सांगली आणि कोकण पट्ट्यात आलेल्या महापुरामुळे तेथील नागरिकांवर मोठे संकट ओढवले. त्या पूरग्रस्तांसाठी मदतीचे कार्य सुरु आहे. तरीही, ठाण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी शक्य असेल तितकी मदत पूरग्रस्तांना करावी. यामुळे उत्सवाच्या माध्यमातून मोठे सामाजिक कार्य मंडळांच्या हातून घडेल असे फणसळकर म्हणाले.
पुढे बोलताना, मुंबई आणि नवी मुंबईलगत ठाणे शहर आहे. त्यामुळे मंडळांनी संशयित व्यक्ती किंवा वस्तू दिसून आल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे अशा सूचनाही त्यांनी गणेशोत्सव मंडळांना केल्या. सणाच्या कालावधीत सोशल मीडियामध्ये अफवा पसरण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. त्यामुळे नागरिकांनी सण-उत्सवांच्या कालावधीत अफवा पसरविणारा संदेश मोबाईलवर आला. तर, त्याची माहिती तत्काळ पोलिसांना द्याावी असेही आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, या कार्यक्रमात 2018 मध्ये पार पडलेल्या गणेशोत्सव स्पर्धेत उत्कृष्ट देखावे सादर करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना तसेच, मान्यवर विभूतींना पुरस्कार आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.