ठाणे - उल्हासनगर कॅम्प नंबर 5 येथील दूध नाका या सार्वजनिक रस्त्यावर सुरू असलेल्या सोरट जुगारावर हील लाईन पोलिसांनी छापा मारला. मात्र, पोलिसांच्या छापेमारी दरम्यान सोरट जुगार चालवणारी आर्ची फरार झाली. तर तिचा साथीदार पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
याप्रकरणी पोलीस शिपाई नवनाथ काळे यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887 चे कलम 12 ए नुसार गुन्हा दाखल करून आर्चीच्या साथीदाराला अटक केली आहे. सुनील पाटील (रा. मंगरूळ, ता. अंबरनाथ, वय 30) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
हेही वाचा- भिवंडीत बनावट मावा बनवणाऱ्या कंपनीवर छापा; बनावट चायनीज, सॉसचा पर्दाफाश
उल्हासनगर शहरात मोठ्या प्रमाणात चोरी चुपके जुगार अड्डे सुरू आहेत, असे असताना अंबरनाथ तालुक्यातील मंगरूळ गावात राहणारा सुनील पाटील हा आर्ची नावाच्या महिलेसोबत बिनधास्तपणे दूध नाका परिसरात सार्वजनिक रोडवर सोरट जुगार चालवत होता.
याची खबर पोलिसांना मिळताच पोलिसांनी सकाळी साडेदहा वाजता छापेमारी करीत सोरट जुगार चालवणारे साहित्य जप्त केले. यावेळी सोरट जुगार चालवणारी आर्ची मात्र पोलिसांना गुंगारा देत फरार झाली. तर तिचा साथीदार सुनील पाटील याला पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हवालदार घोडके करीत आहेत.
हेही वाचा -...अन् असा घातला बंटी-बबलीने सोनाराला गंडा, सव्वा दोन लाखांचे दागिने लंपास