ठाणे - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आणि समाजाचा आरसा म्हणून पत्रकारितेचा मोठा गवगवा केला जातो. मात्र समाजातील दुख उजागर करणाऱ्या पत्रकाराला आयुष्यभर खस्ता खाव्या लागतात. इतकचं नाही तर मरणानंतरही पत्रकाराच्या यातना थांबत नसल्याचे डोंबिवलीतील ज्येष्ठ पत्रकाराच्या मृत्यूनंतर उघड झाले आहे. डोंबिवलीतील ज्येष्ठ पत्रकाराच्या मृत्यूनंतर शवदाहिनी उपलब्ध नसल्याने मृतदेहाची परवड झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर या ज्येष्ठ पत्रकारावर कल्याणच्या लालचौकी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
कल्याण-डोंबिवलीमधील कोरोना रुग्णांची मृत्यूनंतरही परवड सुरूच असल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे. त्यातच ऐनवेळी डोंबिवलीची स्मशानभूमी उपयोगी नसल्याचा अनुभव बुधवारी रात्री आला. ज्येष्ठ पत्रकाराला उपलब्ध झालेल्या अॅम्ब्युलन्समधून सर्वप्रथम बाज आर. आर. हॉस्पिटल व त्यानंतर शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांना कोव्हीड संशयित म्हणून प्रमाणित केले. इथली स्मशानभूमी बंद असल्याने त्यांना कल्याणला घेऊन जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. कल्याणच्या बैलबाजार स्मशानभूमीत वेटींग असल्याने लालचौकी स्मशानभूमीत नेण्यात आले. मात्र तेथील कर्मचाऱ्यांनी ज्येष्ठ पत्रकाराच्या पार्थिवाला हात लावण्यास नकार दिला. त्यामुळे पत्रकार अनिकेत घमंडी आणि ज्येष्ठ पत्रकाराच्या मुलाने मृतदेह गॅस शवदाहिनीवर ठेवला. त्यानंतरच त्या ज्येष्ठ पत्रकाराच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
डोंबिवलीतील शिवमंदिर आणि पाथर्लीची गॅस शवदाहिनी बंद असल्याने कोव्हीड संशयित रुग्ण म्हणून या ज्येष्ठ पत्रकाराच्या पार्थिवावर कल्याणच्या लालचौकी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करावे लागले. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीतील पत्रकारांनी प्रशासनाच्या कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.
ज्येष्ठ पत्रकाराला मिळाला नाही ऑक्सिजन अन् अॅम्बुल्सन
सगळ्यात कहर म्हणजे या ज्येष्ठ पत्रकाराला सुरुवातीला ऑक्सिजन मिळाला नाही. तर अॅम्ब्युलन्सही दीड तास उशिराने आली. मृत्यूनंतर डोंबिवली शहरातील एकही स्मशानभूमी उघडी नसल्याने अर्थात तेथे गॅस शवदाहिनी बंद असल्यानेच त्यांच्या पार्थिवावर कल्याणमध्ये नेऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. डोंबिवलीच्या सर्वच स्मशानभूमीतील गॅस शवदाहिनी बंद असल्याने डोंबिवलीकरांसाठी मोठी शोकांतिका आहे. महापालिकेने कोव्हीड आजाराने किंवा कोव्हीड संशयित मृत झालेल्या व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी विशेष शवदाहिन्या डोंबिवली, कल्याण, टिटवाळा भागात सुरू कराव्यात, या निमीत्ताने ही मागणी पुढे आली आहे.