ठाणे: ७५ लाखांची फसवणूक प्रकरणी शेतकऱ्याच्या फिर्यादीवरून तीन भामट्यांच्या विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रितेश अशोक पाटील, मेघा गौरव पाटील (दोघे रा.केवणी दिवे), तुफान कमलाकर वैती ( रा.कशेळी) अशी गुन्हा दाखल झालेल्या भामट्यांची नावे आहेत.
शासनातर्फे पैसे मंजूर झाले: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवंडी तालुक्यातील मौजे कशेळी येथील जमिन सर्व्हे नं.३४/१ या जमिनीवरती ग्रामपंचायत घर नंबर ६२२/१७ क्षेत्र तळमजला ४४०० चौ.फूट आणि घर नं.६२२/११६ अ आणि घर नं.६२२/११७ अ पहिला मजला क्षेत्र ४४०० चौ.फूट असे एकूण ८८०० चौ.फूट बांधकाम रहिवाशी क्षेत्र या दोन गाळ्यांची जमिन आहे. मुंबई - अहमदाबाद राष्ट्रीय जलदगती रेल्वे प्रकल्पाकरीता शासनामार्फत भूसंपादीत करण्यात आली आहे. त्याचे मोबदल्यात कशेळी येथील शेतकरी नीलकंठ बाळाराम म्हात्रे यांना, सदर जमिनीच्या मोबदल्यात शासनातर्फे ३ कोटी ७३ लाख ६९ हजार ६४ रुपये मंजूर झाले आहेत.
आमिष दाखवून केली फसवणूक: दरम्यान तीन भामट्यानी आपसात संगमत करून, जमिनीच्या मोबदल्याची शासनातर्फे मंजूर झालेली रक्कम शासनाकडून लवकरात लवकर मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर ८ नोव्हेंबर २०१८ ते ३१ मार्च २०२२ पर्यंत मंजूर रक्कमेपैकी, फक्त ५० टक्के रक्कम म्हणजेच १ कोटी ६८ लाख २० हजार ५७९ रुपये मिळवून देण्यासाठी, तिघांनीही आरोपींनी पुन्हा आपसात संगणमत करून शेतकऱ्याकडून ६० लाखांचा पोस्ट डेटेड चेक घेऊन व १५ लाख रुपये रोख घेऊन शेतकऱ्याची फसवणूक केली आहे.
शेतकऱ्याला धमकी दिली: तसेच गुन्हा दाखल असलेल्या तिघा भामट्यांनी ५० टक्के रक्कम मिळवून देण्यासाठी आणखी पैश्यांची मागणी करून पैसे न दिल्यास मोबदल्याची रक्कम निळकंठला मिळू देणार अशीही धमकी दिली. त्यामुळे आपली फसवणूक होत असल्याचे शेतकरी नीलकंठच्या लक्षात आले. त्यानंतर फसवणूक झालेल्या बाधित शेतकरी म्हात्रे यांनी २५ मे २०२३ रोजी शांतीनगर पोलीस ठाण्यात घडलेला प्रकार पोलिसांसमोर सांगितला. पोलिसांनी शेतकरी नीलकंठच्या फिर्यादीवरून तिघांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक राज माळी करीत आहेत.
हेही वाचा -