मीरा भाईंदर - मीरा भाईंदर परिसरात दिवसेंदिवस सायबर क्राईमच्या प्रमाणात वाढ होत आहे. शनिवारी नवघर पोलिसांनी बोगस एटीएमचा वापर करून, नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एका आरोपीला नालासोपारामधून अटक केली आहे. त्याच्याकडून एकूण २६ एटीएम जप्त करण्यात आले आहेत. आरिफ मोहम्मद शेख असे या आरोपीचे नाव आहे.
अशी झाली फसवणूक
भाईंदर पूर्वेच्या शिर्डी नगर बसस्टॉप जवळ असलेल्या एस.बी.आय.बँकेच्या एटीएममध्ये तक्रारदार पैसे काढण्यासाठी गेले असता, एका अनोळखी व्यक्तीने एटीएममध्ये शिरून मदत करू का असे विचारले. त्याने तक्रारदाराचे एटीएम कार्ड घेऊन हातचलाकीने स्वतः कडे असलेल एटीएम कार्ड तक्रारदारांना दिले, व एटीएमचा पिनकोड टाकण्यास सांगितला. पिनकोड टाकताना त्यांने तो माहित करून घेतला. तक्रारदाराने ज्यावेळी आरोपीने दिलेल्या एटीएमने पैसे काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा पैसे निघाले नाहीत. दरम्यान तक्रारदाराने आरोपीला बाहेर जाण्यास सांगितले, ही संधी साधून आरोपी बाहेर गेला, व त्याने दुसऱ्या एटीएममधून 40 हजार रुपये काढले. या प्रकरणी तक्रारदारने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
आरोपीला अटक
दरम्यान तक्रार मिळताच पोलिसांनी संबंधित एटीएममध्ये व परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला. दरम्यान तांत्रिदृष्ट्या तपास करून पोलिसांनी नालासोपारामधून आरोपी मोहम्मद शेख याला अटक केली. आरोपीने आतापर्यंत मुंबईसह मीरा-भाईंदर आणि वसई क्षेत्रात सात गुन्हे केल्याची माहिती समोर आली आहे.
'एक कॅमेरा शहरासाठी'
या आरोपीने मुंबईसह मीरा -भाईंदर, वसई, विरार क्षेत्रात अनेक गुन्हे केले असल्याचे समोर आले आहेत. मात्र अशा घटना घडू नये यासाठी नागरिकांनी स्वतःच्या बँकेची माहिती, एटीएम पिन, इतर कोणत्याही प्रकारची माहिती अनोळखी व्यक्तीला देऊ नये, असे आवाहन पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी केले आहे. त्याचप्रमाणे एक कॅमेरा शहरासाठी द्या असे देखील आवाहन करण्यात आले आहे. त्यांच्या या आवाहनाला व्यापारी व नागरिकांमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
हेही वाचा - तू जगातील सर्वात चांगला नवरा; दिपाली चव्हाण यांचं आत्महत्यापूर्वी पतीला भावनिक पत्र