ठाणे - उल्हासनगरमध्ये इमारतीच्या चौथ्या माळ्याचा स्लॅब कोसळल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत इमारतीतील 19 कुटुंबातील काही जण अडकले असण्याची शक्यता आहे. तर तीन जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
9 जणांना सुखरुप बाहेर काढले -
मोहिनी पॅलेस ही इमारत जवळपास 25 वर्षे जुनी आहे. त्यात 19 कुटुंब वास्तव्याला होती. आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास या इमारतीच्या चौथ्या माळ्याचा स्लॅब कोसळून थेट तळमजल्यावर आला. यामध्ये इमारतीतील 9 जण जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर काही जणांना अग्निशमन दलाने शिडीच्या सहाय्याने बाहेर काढले. मात्र, या घटनेत अजूनही काही जण बेपत्ता असून ते ढिगाऱ्याखाली दाबले गेल्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे अग्निशमन दलाकडून इमारतीचा ढिगारा उपसण्याचे काम सुरू असून रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत 9 जणांना सुखरूप बाहेर काढले आहे.
हेही वाचा - 'म्युकरमायकोसिसचा महात्मा फुले जन आरोग्य योजनेत समावेश'