ठाणे- शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकलसह बस सेवाही सुरू केली आहे. त्यामुळे शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना घरापासून ते रेल्वे स्थानक, बस स्थानकापर्यंत जाण्यासाठी ठराविक रिक्षात प्रवासाची मुभा दिली आहे. मात्र, काही रिक्षाचालक फिजिकल डिस्टन्सच्या नियमांचे उलंघन करुन कोरोनाच्या थैमानातही चौथी सीट घेऊन रिक्षा सुसाट पळविताना दिसत आहे.
कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी ठाणे जिल्ह्यात १२ जुलैपर्यंत १० दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. त्यातच कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसागणिक रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन आकडा १० हजारापर्यंत पोहोचला आहे. महापालिका क्षेत्रात लॉकडाऊनची नियमावली आखण्यात येऊन सुरुवातीला नियम तोडणाऱ्यांवर कारवाईचा बडगाही उगारण्यात आला. असे असताना काही ठिकाणी मात्र नियमाला हरताळ फासून कल्याण रेल्वे स्थानकबाहेर राजरोसपणे रिक्षा चालक चार-चार प्रवासी रिक्षात कोंबून नेत असल्याचे चित्र दिसत आहे.
दुसरीकडे महावितरण कार्यालयाबाहेर वीज बिलाबाबत तक्रारदारांच्या रांगा दिसून येत असून याही ठिकाणी फिजिकल डिस्टन्सचे पालन होत नाही. त्यामुळे कल्याण डोंबिवलीत कोरोना संसर्ग कसा आटोक्यात येईल, हा चिंतेचे विषय बनला आहे. कल्याण डोंबिवली शहरात शेकडोंच्यावर कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. अशातच गेल्या तीन चार दिवसांपासून रिक्षा चालक, सरकारी अधिकारी, कर्मचारी राजरोसपणे नियमाची पायमल्ली करताना दिसतात.
आज तर कल्याण रेल्वे स्टेशन बाहेर रिक्षाचालक ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नव्हते. रिक्षामध्ये चार- पाच प्रवाशी भरताना दिसले. लॉकडाऊन काळात रिक्षा वाहतूक सुरू असल्याने केडीएमसी व पोलिसांच्या आवाहनाला हरताळ फासला आहे. एरव्ही कल्याणमध्ये विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करणारे पोलीस आता कुठे आहेत, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. तर महावितरण कार्यालयाबाहेरही वीज ग्राहकांना वाढीव बिल आल्याने कमी करण्यासाठी किंवा चौकशी करण्यासाठी मोठ्या रांगा लागत आहेत. एकदंरीत पालिका प्रशासन, दुसऱ्या विभागाचे सरकारी अधिकारी आणि पोलीस प्रशासनाने नियमांचे काटेकोरपणे पालन होण्यासाठी कठोर पाऊले उचलली पाहिजेत नाही तर कोरोना शहरात हाहाकार माजवल्याशिवाय राहणार नाही.
हेही वाचा- 'राजगृहावर हल्ल्याचे षडयंत्र रचणाऱ्याला फाशीची शिक्षा द्या'