नवी मुंबई - पनवेलच्या वळवली गावात काही दिवसांच्या अंतराने गावातील एकाच कुटुंबातील चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे. घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सध्या पनवेल तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या 20 हजारांच्या पुढे गेली असून, बळींची संख्या 472 जवळ पोहचली आहे.
महापालिका हद्दीतील वळवळी गावातील एकाच कुटुंबातील 4 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच 20 जण बाधित झाले आहेत. फक्त काही दिवसांच्या अंतराने एका पाठोपाठ होणाऱ्या मृत्यूमुळे कुटुंबातील सर्व सदस्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. शिवाय या कुटुंबातील एका महिलेची तब्येत खालावली असून, त्या अतिदक्षता कक्षात असल्याची माहिती मिळत आहे. एकंदरीत आता कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या ग्रामीण भागात वाढत असून, आता महापालिका प्रशासन, तहसीलदार प्रशासन यांच्यासह लोकप्रतिनिधींनीही कोरोनामुळे ग्रामीण भागातील वाढत्या मृत्यूच्या घटनांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
पनवेलमध्ये सध्या कोरोनाची संख्या वाढत असून, महापालिकेने आता या गावात विशेष मोहीम राबवून या ठिकाणच्या नागरिकांची आरोग्य तपासणी करणे आवश्यक झाले आहे. तसेच, माझे कुटूंब माझी जबाबदारी या उपक्रमांतर्गत तपासणी करावी, अशी मागणी आता नगरसेवक व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील यांनी केली आहे. तसेच या ठिकाणी अजूनही पालिकेचा कोणताही अधिकारी फिरकला नसल्याचे देखील आरोप केला जात आहे. मात्र, पनवेल महापालिका पूर्णपणे या गोष्टींकडे गांभीर्याने पाहत असून, आम्ही गावामध्ये वैद्यकीय अधिकारी यांना पाठवले असून, सर्व गावांची तपासणी करण्यात येणार असल्याचे पालिका उपायुक्त संजय शिंदे यांनी सांगितले.