ठाणे - उल्हासनगरच्या धूरु बारशेजारी दीपक भोईर या तरुणाची मंगळवारी हत्या करण्यात आली होती. या घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला होता. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी मुख्य आरोपीसह चार आरोपींना धुळे आणि इंदूरमधून अटक करण्यात यश मिळवले आहे.
नरेश उर्फ बबल्या चव्हाण, अनिकेत शिरसाठ, राजू कनोजिया, योगेश लाड अशी अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. नरेश उर्फ बबल्या याच्या मावस भावाला काही महिन्यांपूर्वी मृत दीपक भोईर याने जबर मारहाण केली होती. याच मारहाणीचा बदला घेण्यासाठी आरोपीने धुरू बारमधील बारबालेशी संगनमत करून दीपकला बारमध्ये बोलावले. त्याच वेळी बारच्या आवारात दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी दीपकचा पाठलाग करून त्याची तीक्ष्ण हत्याराने हत्या केली.
हेही वाचा - बदलापूर एमआयडीसीतील केमिकल कंपनीत भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, तीन गंभीर
हत्या केल्यानंतर सर्व आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले होते. मात्र, हे आरोपी धुळेमार्गे मध्य प्रदेशात पळून जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या धुळे शाखेला मिळाली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने हॉटेल द्वारकाच्या बाजूला असलेल्या बी. पी. पेट्रोल पंपाजवळ सापळा रचून आरोपींना शिताफीने अटक केली. याच आरोपींना पकडण्यासाठी उल्हासनगर पोलिसांची दोन पथके धुळ्याला रवाना झाली होती.
पोलीस उपनिरीक्षक निरीक्षक सचिन शिंदे, हर्षल राजपूत, मिलिंद बोरसे, धनंजय सांगळे, राहुल काळे, समीर गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणातील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. उल्हासनगरमधील धूरु बारच्या आवारात हत्या होण्याची ही दुसरी घटना आहे.