नवी मुंबई - शहरात कोरोना पाठोपाठ आता म्युकरमायकोसिस या आजाराचा फैलाव वाढला आहे. नवी मुंबईत या आजाराचे तब्बल 29 रुग्ण आढळल्याची माहिती समोर आली आहे. या 29 रुग्णांपैकी 14 रुग्ण हे नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील आहेत. तर इतर 15 रुग्ण नवी मुंबई बाहेरचे आहेत. म्युकरमायकोसिसने बाधित रुग्णांपैकी 4 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली आहे.
राज्यात सध्या कोरोनासोबत म्युकरमायोकोसिस या बुरशीजन्य संसर्गाचाही प्रादुर्भाव वाढला आहे. त्या प्रमाणे ठाणे जिल्ह्यातही या ब्लॅक फंगसचे रुग्ण आढळून येत असून त्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रातच १४ रुग्णांसह २९ रुग्णांना म्युकरमायकोसिसची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या रोगासाठीच्या औधषांच्या पुरवठ्यामध्ये गैरप्रकार न होता योग्य वापर व नियोजन करण्यात यावं. कोरोनातून बरे झालेल्या नागरिकांना म्युकरमायकोसिस अथवा अन्य काही लक्षणं दिसल्यास याची माहिती दूरध्वनीवरुन घेण्यात यावी. म्युकरमायकोसिसचा प्रादुर्भाव कोरोना रुग्णांमध्ये वाढत आहे. या रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी, असे स्पष्ट निर्देश सरकारकडून देण्यात आले आहेत.