ठाणे - नवी मुंबईच्या घणसोलीमधील गोठीवली परिसरातील सेक्टर २३ मध्ये उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीचा धक्का लागल्याने चार लहान मुले जखमी झाली आहेत.
हेही वाचा - स्पेनचा दिग्गज खेळाडू डेव्हिड विलाने जाहीर केली निवृत्ती
घणसोली सेक्टर २३ येथील माऊली हाईट्स या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर अगदी जवळून उच्च दाबाच्या उघड्या तारा गेल्या आहेत. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन याबाबत सोसायटीतर्फे अनेकदा लेखी अर्ज विद्युत विभागाकडे सादर करण्यात आले होते. मात्र, विद्युत विभागाने याकडे लक्ष दिले नाही.
या घटनेमध्ये ५ लहान मुलांना विजेचा जोरदार झटका बसला असून ही मुले जखमी झाली आहेत. हेमांग चंद्रकांत (७), परी सिंग (७), सोमन्य पाटील (८) व तनिशा चव्हाण (७) अशी या मुलांची नावे आहेत. विजेच्या धक्क्यामुळे हेमांग हा मुलगा २० टक्के भाजला असून त्याला नॅशनल बर्न हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. परी सिंग या मुलीला मोदी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. या घटनेत लहान मुलांचे चेहरे जळाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घडलेल्या प्रकाराबाबत माऊली सोसायटीतील रहिवाशांनी संताप व्यक्त केला असून ऐरोली येथील विद्युत कार्यालयावर धडक मोर्चा काढून निदर्शने करणार असल्याचे रहिवाशांनी सांगितले आहे.