ठाणे : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार रमेश कदम यांची 2012 साली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. मातंग समाजाचे मोठे नेते म्हणून रमेश कदम यांची ख्याती आहे. परंतु 2015 साली याच अण्णाभाऊ साठे महामंडळात 312 कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी त्यांच्यावर दहिसर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला होता.
अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या निधीत अपहार : अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या निधीत अपहार केल्याचा आरोप ठेवून त्यांच्यावर आणखी पाच जिल्ह्यातही वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले. कदम यांनी 2019 ची विधानसभा निवडणूक त्यांनी जामीनावर बाहेर येऊन अपक्ष म्हणून लढवली होती. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राहुल रोकडे यांनी त्यांना सर्वच गुन्ह्यात जामीन मंजूर केल्यानं आज अखेर ते तुरुंगातून बाहेर आले.
जामीन मंजूर : गेली आठ वर्षे आपण कारागृहात राहून झालेल्या सर्व आरोपांना सामोरे गेलो. सर्व आरोपांचा सारासार विचार करून न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. त्यामुळं त्यांनी न्यायालयाचे आभार मानले. महामंडळाच्या माध्यमातून जो पैसा वाटला गेला तो कर्जरूपाने होता, त्यामुळे तो आज ना उद्या परत येईलच असे त्यांनी स्पष्ट केले. यामध्ये कोणताही अपहार झाला नाही, असे सांगितले. गेल्या आठ वर्षात अनेक राजकीय स्थित्यंतरे झाले. त्यामुळं येत्या आठ ते पंधरा दिवसात ते मतदार संघात जाऊन आपल्या मूळ विधानसभा मतदारसंघाचा अंदाज घेणार आहेत. त्यानंतर पुढील भूमिका स्पष्ट करणार असल्याचं रमेश कदम यांनी सांगितलंय.
सकाळपासून कार्यकर्त्यांची गर्दी : रमेश कदम यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच कारागृहाबाहेर मोठी गर्दी केली होती. ढोल, ताशे आणि पेढे मागवून ठेवले होते. रमेश कदम बाहेर येताच ढोल ताशांचा मोठा दणदणाट करत कार्यकर्त्यांनी पेढे वाटले. त्यांनी आनंद साजरा केलाय. त्यासोबत त्यांच्या कुटुंबीयांनी देखील समाधान व्यक्त केलंय. कारागृहाजवळील मंदिरामध्ये दर्शन घेऊन रमेश कदम यांनी त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा :