ठाणे - भिवंडी लोकसभा मतदारसंघातून सोमवारी दिवसभरात सात उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून एक दिवस अगोदर म्हणजेच रविवारी एका अपक्ष उमेदवाराने अर्ज दाखल केला होता. त्यामुळे उमेदवारांची संख्या आठवर गेली आहे.
महायुतीचे उमेदवार खासदार कपिल पाटील यांच्या पाठोपाठ संभाजी ब्रिगेडचे संजय काशिनाथ पाटील, वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर अरुण सावंत यांनीही आपल्या समर्थकांसह उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर अपक्ष उमेदवार म्हणून बाळाराम विठ्ठल मात्रे, दीपक पंढरीनाथ खांबेकर, फिरोज अब्दुल रहीम शेख आणि बहुजन महापार्टीचे योगेश मोतीराम कथोरे यांच्यासह भाजपचे देवेश पाटील यांनीही भाजपच्या वतीने डमी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आजपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची संख्या आठ झाली आहे.
मंगळवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने काँग्रेसतर्फे सुरेश टावरे उर्फ बाळ्यामामा या दोन उमेदवारांपैकी उमेदवारी अर्ज भरणार आहे, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. तसेच कुणबी सेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील हेही शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करत असल्याने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत चौरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.