मीरा भाईंदर(ठाणे)- कोरोना विषाणूच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या काळात मीरा भाईंदर मधील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. शहरातील कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या पाच हजारांवर पोहोचली आहे. रविवारी १४८ जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.त्यामुळे एकूण कोरोनामुक्त झालेल्याची संख्या ५०६७ झाली आहे.
शहरातील कोरोनाबाधितांची संख्या साडे सहा हजार पार झाली असली तरी कोरोनामुक्तांची संख्या पाच हजारांवर पोहोचली आहे. मीरा भाईंदर महापालिका कार्यक्षेत्रात १९७०७ जणांनी कोविड चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये ११९८९ जणांचा वैद्यकीय अहवाल नकारात्मक आला आहे.तर ६५५८ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.
शहरात १३६ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.तर एकाचा उपचारादरम्यान कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची संख्या २२० वर पोहोचली.११६० जणांचा कोविड १९ चा वैद्यकीय अहवाल प्रतीक्षेत आहे.१२७१ रुग्णांवर खासगी व शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शहरात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये ८१ नवीन रुग्ण तर ५५ जणांना कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्यामुळे लागण झाली आहे, अशी माहिती मीरा भाईंदर महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी यांनी दिली.
मीरा भाईंदर शहरात टक्केवारी नुसार कोरोनावर उपचार घेत असलेल्याची टक्केवारी १९.३८% आहे.मृत्युदर ३.३५% तर कोरोनामुक्तांची टक्केवारी ७७.२६% आहे. कोरोनामुक्तांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे शहरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.