ठाणे - दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण-डोंबिवली शहरात जागोजागी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे एकीकडे वाहतूक कोंडीच्या समस्येचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे कल्याणातील रस्त्यावर पावसाच्या प्रवाहासोबत चक्क मासे आले होते. या माशांना पकडण्यासाठी बच्चेकंपनी सह नागरिकांची एकच पळापळ केल्याचे दिसून आले आहे.
मासे रस्त्यावर आल्याचा भन्नाट प्रकार कल्याण पश्चिमेकडील श्री कॉम्प्लेक्स परिसरातील डीबी चौकात समोर आला आहे. गेल्या 2 दिवसांपासून संततधार पावसाने कल्याण-डोंबिवली शहराला झोडपून काढले आहे. त्याला सकाळी पुन्हा काहीवेळा मुसळधार बरसलेल्या पावसामुळे डीबी चौकाशेजारी असलेल्या एका शेतात पावसाचे पाणी तुडूंब वाहत होते. हळूहळू शेतातील पाणी रस्त्यावर वाहत असताना या पाण्यातून काहीतरी वळवळत जात असल्याचे नागरिकांना दिसले. त्यांनी नीट निरखून पाहिल्यानंतर चक्क त्यांना मासे दिसले होते. काही वेळातच हा प्रकार परिसरातील बच्चेकंपनीना आणि नागरिकांना कळला. त्यानंतर त्यांनी रस्त्यावर धाव घेऊन मासे पकडण्यासाठी एकच गर्दी केली होती. विशेष म्हणजे हे मासे पकडण्यासाठी कुठलेही जाळे वापरण्यात आले नव्हते, तर चक्क हातानेच पकडून हे मासे प्लास्टिकच्या आणलेल्या पिशवीत थोडेसे पाणी भरून त्यामध्ये त्या माशांना पकडून ठेवताना दिसत होते.
काही वेळाने पावसाचा जोर कमी होताच हळूहळू रस्त्यावर आलेले पावसाचे पाणीही कमी होत गेले. त्यामुळे मासेही रस्त्यावर येणे बंद झाले, आणि त्यांना पकडायला तसेच पाहायला आलेली गर्दीही ओसरली आहे.