ठाणे: वैष्णवी पाटील ही ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यात आलेल्या मांगरूळ गावची रहिवाशी आहे. तिने कल्याण तालुक्यातील नांदिवली गावातील 'जय बजरंग तालीम'मध्ये कुस्तीचे धडे शालेय जीवनापासूनच घेतले आहेत. उस्ताद पंढरीनाथ ढोणे आणि वसंत साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली ती कुस्तीचा सराव करीत आहे. वैष्णवीला लहानपणापासूनच कुस्तीची आवड आहे. तिने आतापर्यंत सहा ते सात राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धा गाजविल्या आहेत. ती महाराष्ट्र केसरीच्या पहिल्याच स्पर्धेमध्ये पोहचली असून तिच्या कामगिरीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.
वैष्णवीच्या विजयाकडे ठाणेकरांचे लक्ष: वैष्णवी पाटील हिला वडील दिलीप पाटील आणि आई पुष्पा पाटील यांच्याकडून लहानपणापासून कुस्ती आणि पैलवानकीसाठी प्रोत्साहन मिळाले आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेपर्यंतच मला न थांबता आंतरराष्ट्रीय आणि ऑलम्पिकपर्यंत मजल मारायची असून देशाचे नाव उंचवायचे आहे, असे वैष्णवीने संगितले आहे. त्यामुळे वैष्णवी पाटील ही पहिल्या महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून ठाणे जिल्ह्यात घेऊन येणार का? हे काही तासातच समोर येणार आहे. वैष्णवीने यापूर्वी विशाखापट्टणम येथे 'सीनियर नॅशनल चॅम्पियनशिप' या ब्राँझ पदकाची कमाई केली आहे.
जिवलग मैत्रिणी ठरणार प्रतिस्पर्धी: विशेष म्हणजे, प्रतीक्षा बागडी आणि वैष्णवी पाटील ह्या दोघी चांगल्या मैत्रीणी असून हरियाणामधील कुस्तीची तालीम करताना दोघी एकत्र खोलीत राहत होत्या. आज मात्र या दोघी महिला महाराष्ट्र केसरीच्या अंतिम स्पर्धेत कोणता डावपेच एकमेकांना वापरून आपल्या मैत्रिणीला चीत करण्याचा प्रयत्न करणार. हा प्रसंग पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
महाराष्ट्रात कुस्तीला सुगीचे दिवस: राज्यातील क्रिडाप्रेमींमध्ये कुस्तीची लोकप्रियता वाढत आहे. महिलांबरोबरच पुरुष वर्गाकडूनही कुस्तीच्या योगदानात भर पडली आहे. याआधी पुण्यातील कुस्तीपटू अभिजीत कटके याने 9 जानेवारी, 2023 रोजी मानाचा हिंदकेसरी किताब पटकावला होता. भारतीय शैली कुस्ती महासंघाने दिनांक ५ जानेवारी ते ८ जानेवारी दरम्यान हैदराबाद, तेलंगणा येथे अखिल भारतीय ५१ वी हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा -२०२३ आयोजित केलेली होती. या स्पर्धेत फायनलमध्ये हरियाणा सोमविर विरुद्ध अभिजीत कटके हा सामना झाला. या सामन्यात कटके याने 5 - 0 ने सोमविर याचा पराभव करून हिंद केसरी किताब पटकावला होता.
आनंद उत्सव साजरा: अभिजीत कटके याने हिंद केसरी हा किताब पटकावल्यानंतर तिच्या घरच्यांनी घराबाहेर फटाके फोडत आनंद उत्सव साजरा केला होता. यावेळी अभिजीत कटकेच्या आई म्हणाल्या की, तो 17 वर्ष झाले माझ्यापासून लांब झाला आहे. आज तो हिंद केसरी झाला आहे. याचा आम्हाला खूप अभिमान वाटत आहे. आम्ही जे स्वप्न राहील होते, ते त्याने पूर्ण केले आहे. तो आला की, आम्ही त्याचे जंगी स्वागत करणार आहोत. त्याला आवडीचे सर्व पदार्थ खाऊ घालणार असल्याचे यावेळी त्याच्या घरच्यांनी सांगितले आहे. अभिजित कटके यांच्या घरी अतिशय आनंदाचे वातावरण आहे. अभिजीतच्या यशामुळे प्रयत्नांचे सार्थक झाले, अशा कटकेंच्या आई म्हणाल्या.