ठाणे - भिवंडीत सेनेच्या शाखाध्यक्षासह एका महिलेवर गोळीबार झाल्याची घटना ताजी असतानाच गाडी मागे घेण्यावरून झालेल्या वादातून एकावर गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ही घटना भिवंडीतील पायगाव गावात शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रफुल तांगडी असे या गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर गोळीबार करणारा हल्लोखोर फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
रस्ता अरुंद असल्याने जखमी व हल्लेखोरामध्ये वाद
भिवंडी तालुक्यातील पायगाव येथे फोर्टी प्लस क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते, मात्र या क्रिकेट ग्राऊंडकडे जाणारा रस्ता अरुंद असल्याने जखमी व हल्लेखोर यांच्या गाड्या समोरासमोर आल्या असता गाड्या मागे घेण्यावरून दोन गटात शाब्दिक बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले व त्यांनतर एका तरुणानाने चक्क प्रफुल याच्यावर रिव्हॉल्वर ने पाच राउंड फायर केले. या गोळीबारात प्रफुल गंभीर जखमी झाला असून, त्याच्या छातीवर, पोटावर व हातावर तीन गोळ्या लागल्या असल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. त्याला उपचारासाठी ठाण्याच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर गोळीबार करणारा हल्लाखोर तरुण फरार झाला असून, भिवंडी तालुका पोलीस त्याचा कसून शोध घेत असल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम भालसिंग यांनी दिली आहे.
लागोपाठोपाठ गोळीबाराच्या घटना
भिवंडीत लागोपाठोपाठ गोळीबाराच्या घटना घडत असल्याने हल्लेखोरांजवळ हे अवैध रिव्हॉल्वर कुठून येतात असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. पोलीस प्रशासन याविरोधात कठोर भूमिका का घेत नाहीत असा सवाल देखील उपस्थित होत आहे. तर हा गोळीबार पूर्व वैमनस्यातून झाला आहे का त्यानुषंगाने देखील पोलीस तपास करीत आहेत.