नवी मुंबई : नवी मुंबईतील पनवेल परिसरात बांधकाम व्यवसायिक म्हणून काम करणाऱ्या एका महिलेवर दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे. 20 ते 25 दिवसांपूर्वी बेलापूर येथे बिल्डरवर भररस्त्यात गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. नवी मुंबईत अशा घटना एका मागोमाग घडत असल्याने नवी मुंबई परिसरात घबराट पसरली आहे. पनवेल परिसरात बांधकाम आणि रियल इस्टेटचा व्यवसाय स्नेहल पाटील या करत होत्या. स्नेहल या पनवेलवरून उरणला त्यांच्या चारचाकीने जात होत्या. तेव्हा काल रात्रीच्या वेळेस हा गोळाबार करण्यात आला.
गाडीवर गोळीबार : स्नेहल पाटील आपल्या मावसभावासह रात्री उशिरा त्यांच्या घरी जात होत्या. त्यावेळेस गव्हाण फाटा येथे अज्ञात व्यक्तीने येवून स्नेहल पाटील यांच्या गाडीवर गोळीबार केला. यावेळी गोळी स्नेहल पाटील यांच्या पायाला लागली. त्यामुळे त्यांना उपचारासाठी नेरूळ येथील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्नेहल यांच्यावर झालेला हा गोळीबार व्यावसायिक वादातून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. महिनाभरात बांधकाम व्यवसायिकांवर जीवघेणा हल्ला होण्याच्या एका मागोमाग दोन घटना घडल्या. त्यामुळे नवी मुंबई व पनवेल परिसरातील बांधकाम व्यवसायिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
पोलिसांकडून आरोपींचा शोध : पनवेल शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे. बिल्डरवर गोळीबार करण्याची मात्र ही एकाच महिन्यातील दुसरी घटना आहे. 15 मार्चला बांधकाम व्यावसायिक सावजी मंजेरी यांची नेरूळमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. पाच दिवसांनी नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने तीन आरोपींना अटक केली केले होते. ही हत्या करण्यासाठी 25 लाख रुपयांचे कंत्राट दिले होते.
गोळीबार झाल्याची घटना : जानेवारी महिन्यात देखील ठाण्यात गोळीबार झाल्याची घटना घडली होती. चोरी करण्याच्या हेतूने व्यापाऱ्याच्या मुलावर गोळीबार करण्यात आला होता. पोलिसांनी आरोपींकडून दोन पिस्तुल आणि काडतुसे जप्त केली होती. नागपूरमध्ये देखील पानठेला चालकावर गोळीबार झाल्याची घटना घडली होती. गाडीला धडक दिल्याच्या वादातून ही घटना घडली होती.
हेही वाचा : Firing On TDP Leader: भरदिवसा टीडीपीच्या नेत्यावर गोळीबार.. गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल