ठाणे- भिवंडी तालुक्यात आगीचे सत्र सुरूच असून आज मंगळवारी पुन्हा येथील दुमजली गोदामाला भीषण आग लागली. तालुक्यातील पूर्णा ग्रामपंचायत हद्दीतील कापऱ्या बाबा कंपाऊंड येथील प्रिमियर ट्रेडर्सच्या इमारतीत आग लागली आहे. या घटनेत इमारतीच्या गोदामात साठवून ठेवलेला सुंगधी धूप (लोबान) खाक झाला आहे.
तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गोदाम व्यवसाय फोफावला आहे. दिवाळीनिमित्त सदरील परिसरात सर्व व्यवहार ठप्प होते. अशातच आज पूर्णा ग्रामपंचायत हद्दीतील कापऱ्या बाबा कंपाऊंड येथील प्रिमियर ट्रेडर्सच्या पहिल्या मजल्याला आग लागली. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर गोदाम होते. त्यात मेण व पूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या लोबानाचा मोठा साठा होता. ही आग सकाळी ८ वाजताच्या सुमारास लागली. आग लागल्यानंतर मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट पसरले होते. आगीची माहिती मिळताच भिवंडी अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. मात्र, आगीची व्याप्ती अधिक असल्याने भिवंडी, ठाणे येथून अग्निशामक दलाची अधिक कुमक बोलविण्यात आली.
आगीच्या धुरामुळे त्यावर नियंत्रण मिळविण्यात अडचण येत होती. त्यामुळे पूर्णा ग्रामपंचायतीचे वरिष्ठ लिपिक विनायक पाटील यांनी ग्रामस्थांकडून जेसीबी तसेच खासगी पाण्याचे टँकर उपलब्ध करून देऊन जेसीबीच्या मदतीने गोदामाच्या भिंती तोडल्या. त्यामुळे आगीचे लोट बाहेर आले. मग त्यावर पाण्याचा मारा करीत अथक प्रयत्नानंतर तीन तासांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले.
हेही वाचा- ठाण्यात 'खादी'साठी खाकी वर्दीचे ९३ टक्के मतदान; पोलीस ठरले जागरुक मतदार
दरम्यान, दिवाळीनिमित्त परिसरातील सर्वच गोदाम बंद असताना या गोदामास नक्की आग लागली कशी? याबाबत कोणतीही माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे येथील आगीच्या घटना नेहमीच संशयाच्या भोवऱ्यात अडकलेल्या असतात. या आगीच्या घटनेत लाखो रुपयांचे लोबान जळून खाक झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
हेही वाचा- 'माझा आमदार, माझा मुख्यमंत्री'; युवा सेनेची नवी मोहीम ?