ठाणे - भिवंडी तालुक्यातील दापोडा ग्रामपंचायत हद्दीतील इंडियन कॉर्पोरेशनच्या गोदाम संकुलातील गोदामांना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत आतापर्यंत पाच गोदामं जळून खाक झाली आहेत.
ही आग इंडियन कॉर्पोरेशन गोदाम संकुलातील इमारत क्रमांक 229 मधील गोदाम क्रमांक 7 येथे असलेल्या पेपर अँड बोर्ड इंप्लाय या गोदामात दुपारच्या सुमारास लागली. नंतर नजीकच्या कॉर्डस्ट्रिप्स शुअर या गोदामापासून बघता बघता ही ॉ आग जवळच्या 5 गोदामांमध्ये पसरली. यात साठवून ठेवलेले प्लास्टिक साहित्य, रंगीत कागदी पॅकिंग यंत्र व कच्चा माल जळून खाक झाला आहे. नजीकच्या गोदामातील फरसाण बनवण्याच्या कारखान्यातही आग पसरून येथील सर्व साहित्य जळाले आहे.
घटनेची माहिती मिळताच भिवंडी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी खासगी टँकरच्या मदतीने ही आग दोन ते अडीच तासांच्या प्रयत्नानंतर आटोक्यात आणण्यात यश आले आहे. मात्र, आग अजूनही धुमसत आहे. या आगीत सर्व गोदामांचे पत्र्यांचे छत, लोखंडी अँगल कोसळले आहेत.
या आगीच्या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सध्या घटनास्थळी कुलिंगचे काम सुरू असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने दिली आहे. तर नेमकी ही आग कशामुळे लागली याची माहिती अद्यापही समजू शकली नसल्याचे सांगण्यात आले.