ठाणे - भिवंडीत नारायण कंपाऊंड परिसरात असलेल्या तीन मजली मोती कारखान्याला भीषण आग लागली. आगीत संपूर्ण कारखाना जळून खाक झाला. कारखान्यात केमिकलयुक्त ज्वलनशील पदार्थांचा साठा आणि प्लास्टिकच्या मोत्यांचा साठा असल्याने काही क्षणातच आग पसरली. चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली. आगीमध्ये लाखो रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले.
शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या या मोती कारखान्यात सकाळच्या सत्रातील कामगार काम करत होते. सकाळी १० वाजताच्या सुमारास कारखान्याला अचानक आग लागली. आग लागल्याचे समजताच सर्व कामगारांनी कारखान्याबाहेर पळ काढला. त्यामुळे आगीच्या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. आग लागल्यानंतर याची माहिती अग्निशामक दलाला देण्यात आली.
हेही वाचा - ग्राहकांना मोठा दिलासा; पेट्रोल-डिझेलचे दर आणखी उतरले
अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होवून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र आग सर्व कारखान्यात पसरल्याने अग्निशामक दलाच्या जवानांना आग आटोक्यात आणण्यासाठी चार तास प्रयत्न करावे लागले. सध्या याठिकाणी कुलींगचे काम सुरू असून आगीचे कारण अध्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत शांतीनगर पोलीस अधिक तपास करत आहेत.
भिवंडी शहरात मोठ्या प्रमाणात नागरीवस्त्यांमध्ये बेकादेशीर प्लास्टिकचे मोती तयार करण्याचे कारखाने आहेत. या गोदामांमध्ये अत्यंत ज्वलनशील, अति धोकादायक रासायनिक पदार्थ आणि साहित्याचा साठा केला जातो. यामुळे येथे वारंवार आगी लागण्याचे प्रकार घडतात. चार वर्षांपूर्वीही याच परिसरातील एका मोती कारखान्याला आग लागून दोन कामगारांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यावेळी पालिका प्रशासनाने शहरातील मोती कारखाने बंद करण्याचे फर्मान काढून संबधित कारखाना मालकांना नोटीसा बजावल्या होत्या. मात्र, पालिकेची ही कारवाई कागदावरच राहीली.
यानंतर दोन वर्षांपूर्वी भिवंडी-ठाणे महामार्गावरील राहनाळ येथे लाकडाच्या वखारीत लागलेल्या आगीत आतमध्ये झोपलेल्या सहा कामगारांचा होरपळून मृत्यू झाला होता. तसेच मागच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये दापोडा येथे लागलेल्या आगीत तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. भिवंडीतील अग्नी तांडव थांबणार कधी असा प्रश्न येथील रहिवासी उपस्थित करत आहेत.