नवी मुंबई - कळंबोली येथील स्टील मार्केटमध्ये टायर गोदामाला आग लागली आहे. अग्नीशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचले असून, आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.आज संध्याकाळी कळंबोली स्टील मार्केटमधील भीषण आगीत टायर गोदाम जळून खाक झाल्याची घटना घडली. मोठ्या प्रमाणात टायरचा साठा असल्यामुळे आगीची धग जास्त होती. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे.
या गोदामात विविध कंपन्यांचे टायर साठवून ठेवले होते. सुरुवातीला क्षुल्लक वाटणारी आग गोदामापर्यंत पोहोचली आणि आगीच्या धगीने गोदामाने पेट घेतला. गोदामात ठेवलेल्या टायरने मोठा पेट घेतल्यामुळे पुढील काही मिनिटांत आगीची तीव्रता वाढली. तळोजा एमआयडीसी, सिडकोचे नवीन पनवेल, कळंबोलीतील आणि पनवेल महापालिकेचे बंब आग विझविण्यासाठी घटनास्थळी पोहोचले आहेत. आगीचे प्रमाण मोठे असल्यामुळे बराच वेळ आग आटोक्यात आली नाही आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी शेकडो टायर आगीत जळून खाक झाल्यामुळे लाखोंचे नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे सुरक्षेची काळजी न घेता गोदाम उभारले असल्याचे बोलले जात आहे. या परिसरात अशा प्रकारे अन्य अनेक गोदामे आहेत.