ठाणे : भिवंडी शहरात रात्री सुमारास भीषण आगीची घटना घडली. फातिमानगर परिसरातील एका कापड गोदामाला बुधवारी पहाटे एकच्या सुमारास ही आग लागली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या दोन गाड्या आणि तीन टँकर तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर दोन तासांमध्ये या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.
लाखोंचे नुकसान..
फातिमानगर हा दाट वस्तीचा परिसर आहे. या परिसराच्या मधोमध असलेल्या कापड गोदामाला आग लागली होती. अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचेपर्यंतच लाखो रुपयांचे कापड आणि धाग्याचे कोम जळून खाक झाले.
आगीचे कारण अस्पष्ट..
गोदामाला ही आग कशी लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. दाटीवाटीच्या वस्तीत असा प्रकार पुन्हा घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, या आगीत अद्याप कोणी जखमी झाल्याची माहिती समोर आली नाही.
यापूर्वीही कपड्याच्या गोदामांसह यंत्रमाग कारखान्याला लागल्या होत्या आगी..
तीन दिवसापूर्वीच भिवंडी शहरात अंजूर फाटा येथील चौधरी कंपाऊंड परिसरामध्ये एका यंत्रमाग कारखान्यामध्ये भीषण आग लागली होती. याठिकाणी मोठ्या प्रमाणात कपड्यांचा साठा जळून खाक झाला होता. तर आठ दिवसापूर्वीही भिवंडीतील राहनाळ गावात बस स्थानकाजवळ असलेल्या दौलत कंपाऊंड येथे एका गोदामाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली होती. या आगीत गोदामातील लाखो रुपयांचे धाग्यांचे कोम जळून खाक झाले. या गोदामात कापड बनवण्यासाठी लागणारे ताग्याच्या कोमचा साठा मोठ्या प्रमाणात करण्यात आला होता. त्यामुळे आगीने काही क्षणातच रौद्ररुप धारण केले होते.
हेही वाचा : गुजरातमधील केमिकल कंपन्यांमध्ये भीषण स्फोट; अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात..