मीरा भाईंदर - भाईंदर पूर्व परिसरातील गोल्डन नेस्ट परिसरात असलेल्या कॅनरा बँकेला दुपारी पावणे दोनच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली. या आगीवर आता नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. तात्काळ अग्निशामक यंत्रणा घटनास्थळी पोहचल्याने बँकेमधील रोख रक्कम जळण्यापासून वाचवण्यात प्रशासनाला यश आले आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.
भाईंदर पूर्व परिसरातील गोल्डन नेस्ट परिसरात असलेल्या कॅनरा बँकेला मंगळवारी दुपारी पाऊणे दोनच्या सुमारास आग लागली. आगीचे प्रमाण वाढत जात असल्यामुळे बँकेतील कर्मचाऱ्यांनी या संदर्भात अग्निशामक यंत्रणेला माहिती दिली. त्यानुसार दोनच्या सुमारास अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. यात अग्निशामक दलाची एक गाडी उपस्थितीत होती. महत्वाची बाब म्हणजे या आगीत बँकेतील रोख रक्कम आणि महत्वाची कागदपत्रे जळण्याची शक्यता अधिक निर्माण झाली होती. मात्र, अग्निशामक दलाच्या सतर्कतेमुळे आगीवर अवघ्या पंधरा मिनिटात नियंत्रण मिळवण्यात यश प्राप्त झाले.
दोनच्या सुमारास घटनास्थळी अग्निशामक दल दाखल झाले. यामध्ये बँकेतील फर्निचर आणि वातानुकूलीत यंत्रणांचे नुकसान झाले असून, कोणत्याही स्वरूपाची जीवितहानी झाली नाही. तसेच संपूर्ण रोख रक्कम जाळल्यापासून वाचण्यात यश आले, अशी माहिती अग्निशामक दल मुख्य अधिकारी प्रकाश बोराडे यांनी दिली.