ठाणे - डोंबिवलीतील औद्योगिक विभागाच्या फेज 2 मधील एका बिस्कीट व चॉकलेटचा साठा केलेल्या गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली. प्रसंगावधान साधून गोदामामधील कामगारांनी वेळेतच बाहेर पळ काढल्याने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमाक दलाच्या जवानांनी तातडीने ही आग नियंत्रणात आणल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र, बिस्कीट व चॉकलेटचा काही साठा या आगीत जळून खाक झाला आहे.
डोंबिवलीतील औद्योगिक विभागाच्या फेज 2 मध्ये सांगाव येथे वरद विनायक एजन्सीचे बिस्कीट व चॉकलेटचे गोडाऊन आहे. या गोडाऊनमध्ये चॉकलेट आणि बिस्किटांचा मोठ्या प्रमाणात माल साठवून ठेवला होता. मात्र, आज सकाळच्या सुमाराला गोडाऊनच्या आतील कार्यालयातून अचानक धूर येऊ लागल्यामुळे कर्मचाऱ्यांनी घाबरून बाहेर पळ काढला.
या आगीची माहिती मिळताच तातडीने पोलीस व अग्निशमाक दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या प्रयत्नाने ही आग वेळीच नियंत्रणात आली. मात्र, या आगीत बिस्कीट व चॉकलेटचा काही साठा जळून खाक झाला आहे. अद्याप आगीचे कारण समजू शकले नसले तरी ही आग इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटमुळे लागली असावी, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.