मीरा भाईंदर (ठाणे) - येथील बांधकाम व्यावसायिक सय्यद मुनावर हुसेन याच्यावर लग्नाचे आमिष दाखवून सातत्याने शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा काशिमीरा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.
पीडित आपल्या मुळगाव चंद्रपूरवरुन कामानिमित्त दहा वर्षांपूर्वी मुंबईत आली होती. यांनतर अंधेरीमधील बांधकाम व्यावसायिक मुनावर यांच्याशी ओळख झाली. 2012 मध्ये मुनावर यांच्या अंधेरीतील मायक्रॉन कन्स्ट्रक्शन कंपनीत ती काम करू लागली. त्यानंतर मुनावर यांनी मीरा रोडमधील ऑफिसमध्ये तिला रिसेप्शनिस्ट म्हणून नोकरीवर रुजू केले. त्याठिकाणी दोघांचे प्रेमसंबंध जुळले व मुनावरने लग्नाचे आश्वासन देऊन तिच्याशी कधी लॉजमध्ये तर कधी घरी शारीरिक संबंध ठेवले.
दोघांचे प्रेमसंबंध असल्याची माहिती मुनावर यांच्या पत्नीला समजली आणि मुनावर आणि त्याच्या पत्नीमध्ये भांडण सुरू झाले. यानंतर पीडित महिलेला नोकरीवरुन काढण्यात आले. त्यानंतरही मुनावर याने तुझ्याशी लग्न करेन, असे आश्वासन देत तिच्याशी शरीरसंबंध ठेवले.
या दोघांमध्ये नवरा-बायकोसारखे नाते असल्याने ७ ऑगस्टला पीडिता मुनावरकडे खर्चासाठी पैसे मागायला गेली असता त्याने तिला मारहाण केली. पीडितेला समजले कि मुनावर याने दुसरे लग्नपण केले आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तिने दिलेल्या फिर्यादीवरुन गुरुवारी रात्री काशिमीरा पोलिसांनी मुनावर विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी काशिमीरा पोलीस पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, 2019 विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी मुनावर हुसेन यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. ते माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांचे भाऊ आहेत. मात्र, काही वर्षांपासून त्यांना घरातून बेदखल केले आहे.