ठाणे - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १४ मार्चला राज्य सरकारने सार्वजनिक कार्यक्रम आयोजनावर बंदी घातली होती. तरी देखील सरकारी आदेशाला केराची टोपली दाखवत १८ व १९ मार्चला डोंबिवली पश्चिमेला हळद आणि लग्न सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित केला होता.
या हळद आणि लग्न सोहळ्याला परदेशातून आलेल्या एक व्यक्ती सहभागी झाला होता. धक्कादायक बाब म्हणजे त्याला कोरोनाची लागण झाली होती. त्या परदेशी व्यक्तीमुळे हळदी व लग्न समारंभाला आलेल्यांना कोरोनाची लागण झाली असावी. समारंभासाठी नेमके किती लोक होते. याची पोलीस माहिती घेत असून लग्न व हळदी कार्यक्रमा आयोजन करणाऱ्यांवर शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत रामनगर आणि विष्णूनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आहेर यांनी दिली हळदी समारंभ 18 मार्च तर 19 मार्च रोजी लग्न झाले होते. या दोन्ही कार्याला मोठ्या प्रमाणात एका समाजाचे नागरिक हजर होते. या सगळ्यांची चौकशी सुरू करण्यात आली असल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप राऊत यांनी सांगितले.