ठाणे - जन आशीर्वाद यात्रेत काही ठिकाणी मोठ्याप्रमाणात गर्दी झाल्याचे मान्य करत जन आशीर्वाद यात्रेच्या आयोजकांवरील गुन्हे राजकीय हेतून प्रेरित असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली आहे. तसेच या गर्दीत काही जण यात्रेला गालबोट लागावे म्हणून प्रयत्न करीत होते, असा आरोपही त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.
'मग त्यांच्यावर सरकारने कारवाई का केली नाही?' -
सरकारने कोरोनाबाबत नियमावली जाहीर केली. मात्र, भिवंडीत तर गेल्या २ वर्षात कोणीही माक्स घातले नाहीत. मग त्यांच्यावर सरकारने कारवाई का केली नाही? मग आमच्यावर का गुन्हे दाखल केले, असा प्रश्न उपस्थित करून स्थानिक पोलीस व महापालिका प्रशासनांवर केंद्रीय राज्यमंत्री पाटील यांनी जन आशीर्वाद यात्रेच्या आयोजकांवर गुन्हे दाखल झाल्याने आक्षेप घेतला.
'महाविकास आघाडीच्या लोकप्रिनिधीनी निधी आणला का?' -
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्या सरकारच्या ताब्यात भिवंडी महापालिका आहे. मग आज भिवंडीच्या विविध रस्त्याचे काम का थांबले. या राज्य सरकारमधील भिवंडीतील स्थानिक काँग्रेस व शिवसेनेच्या प्रतिनिधींनी ७ रुपये तरी रस्त्याच्या कामासाठी निधी आणला का, असा टोला केंद्रीय राज्यमंत्री पाटील यांनी लगावत आज भिवंडी शहरातील जे विविध रस्त्यांची कामे सुरु त्याला लागणार निधी आमच्या प्रयत्नामुळे आला. तसेच इतरही विकासकांची कामे सुरूच आहे. त्यामुळे येथील जनतेने मला निवडून दिले आहे, असेही ते म्हणाले.
'यात्रेला मिळालेला प्रतिसाद हा जनतेचा मोदींना आशीर्वाद' -
जोरदार पावसातही जन आशीर्वाद यात्रेच्या स्वागतासाठी रस्त्यावर उतरणारा प्रचंड जनसमुदाय म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जनतेने दिलेला मोठा आशीर्वाद आहे, असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी शुक्रवारी केले. जनतेने आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी कटीबद्ध राहू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. जन आशीर्वाद यात्रेचा आज पाचव्या दिवशी दुपारी भिवंडी जवळ दिवे अंजूर येथे जाहीर सभेने समारोप झाला. त्या प्रसंगी ते बोलत होते. तत्पूर्वी सकाळी अंजुर फाटा येथे त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. काल्हेर येथे जाहीर सभेत त्यांनी केंद्रीय योजनांची माहिती देत या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. जिल्ह्याला प्रथमच केंद्रीय मंत्रीपद दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र व ईमेल पाठवून आभार व्यक्त करण्याचे आवाहनही त्यांनी ग्रामस्थांना केले.
हेही वाचा - जन आशीर्वाद यात्रा : आयोजकांवर 12 पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल