ठाणे- लग्न सोहळा म्हटले की निमंत्रण पत्रिका छापावी लागते. मात्र, लग्न सोहळा आटोपला की महागातल्या महाग लग्न निमंत्रण पत्रिका रद्दीमध्ये फेकल्या जातात. त्यामुळे, आपल्या मुलाच्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेची रद्दी होऊ नये, ती किमान काही दिवस तरी वापरली जावी यासाठी विवाह बंधनात अडकणाऱ्या मुलाच्या पित्याने वेगळीच शक्कल लढवली आहे. त्यांनी वहीलाच लग्नपत्रिका केली आहे.
या आगळ्यावेगळ्या संकल्पनेतून अंबरनाथमधील गिरीश त्रिवेदी आणि मनीषा त्रिवेदी यांनी आपला मुलगा चिंतन याच्या लग्नासाठी खास १ हजार निमंत्रण पत्रिका छापल्या आहेत. यात विशेष म्हणजे, २०० पानी वहीच्या मुख्यपृष्ठावर या लग्नाच्या निमंत्रण पत्रिका छापण्यात आल्या आहेत. १ फेब्रुवारीला गिरीश त्रिवेदी यांचा मुलगा चिंतन याचा लग्न सोहळा पार पडणार आहे. या लग्न सोहळ्यासाठी त्रिवेदी परिवाराने नातेवाईक आणि मित्र मंडळींना निमंत्रण देखील द्यायला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, या निमंत्रण पत्रिकेत त्रिवेदी यांनी पत्नी मनीषा यांच्या आई-वडिलांचेही नाव छापले आहे. वहीच्या मुखपृष्ठावर आपल्या मुलाच्या लग्नाचा निमंत्रणाचा मजकूर छापला आहे. अंबरनाथमधील त्रिवेदी कुटुंबाने मुलाच्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेच्या रूपात आगळावेगळा प्रयोग केला असल्याने ही निमंत्रण पत्रिका पाहून प्रत्येकजण या परिवाराचे कौतुक करताना दिसत आहे.
हेही वाचा- पंतप्रधान आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंतांचा आरोप