ठाणे - श्रावण महिना सुरू झाला की खवय्यांना मोठ्या प्रमाणात हे माळरानांवर उत्पादन घेतल्या जाणाऱ्या भाज्यांचे वेध लागतात. या मध्ये विशेषतः ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील काकडवाल आणि कुंभार्ली गावच्या माळरानांवर उत्पादन घेतल्या जाणाऱ्या नऊ आरी भेंड्यांची सध्या जास्त चर्चा आहे. दिसायला सफेद आणि त्याला असलेल्या नऊ आऱ्यांमुळे त्यांची चवही काही ठराविक दिवसातच असते. त्यामुळे सध्या पेट्रोलच्या वाढत्या दरांना देखील मागे टाकत सफेद भेंडीने यंदा बाजारात किलोला १२० ते १४० असा दर मिळत असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे.
ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हे माळरानांवर विविध फळभाज्यांचे उत्पादन हे घेतले जाते. प्रामुख्याने पावसाळ्यात पाणी अधिक असल्याने भेंडी, पडवळ, शिरोळे यांचे उत्पादन हे सर्वाधिक घेतले जात असते. त्यातच यंदा सफेद भेंडी लागवड केलेल्या शेतकऱ्यांसाठी कोरोना महामारी नंतर अच्छे दिन आले असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला. भेंडी ही भाजी आयुर्वैदिक असल्याने अनेक जण हे भेंड्याच्या भाजीला पावसाळ्यात आपल्या ताटातील भाजीत अधिक महत्व देत असतात, अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून येते.
हिरवी भेंडी ही बाजारात सहजच उपलब्ध होत असते. मात्र या हिरव्या भेंडीला देखील मागे सारत यंदा पांढऱ्या भेंडीने बाजारात आपली किंमत ही शंभरी पार केली आहे. विशेषता मलंगगड भागातील काकडवाल आणि कुंभार्ली गावच्या माळरानांवर या पिकाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जात आहे. श्रावणात शाकाहारी भाज्यांच्या किंमती या गगनाला भिडत असतात मात्र या सफेद भेंडीने यंदा सर्वाधिक दर हे शेतकऱ्याला मिळून दिले आहे. या भेंडीचे दर हे सर्वाधिक असल्याने कमी भाजी विक्रेत्यांकडे ही भाजी विक्रीसाठी उपलब्ध असते. ग्रामीण भागातून जाणाऱ्या महामार्गांच्या कडेला या भाज्या विक्रीसाठी उपलब्ध असतात. त्यामुळे खरेदीदार मोठ्या प्रमाणात भेंडी घेताना दिसून येतात.
बाजार समितीत सफेद भेंडीची विक्री नाही..
सफेद भेंडीच्या पिकाला चांगले दर मिळते, मात्र या पिकाचे बियाणे लवकर बाजारात मिळत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे एकीकडे इंधन दरवाढ होत असली तरी यंदा पांढऱ्या भेंडीने आपले दर देखील वधारून ठेवले असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. वाढत्या दरामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र बाजार समितीत या भेंडीची विक्री होत नाही. त्यामुळे या भेंडीला घाऊक दर किलो मागे १२ ते १५ रुपये असल्याचेही कल्याण बाजार समितीमधील भाजीपाला विक्रते गणेश पोखरकर यांनी सांगितले.