ठाणे: शहापूर तालुक्यातील कसारा वनपरिक्षेत्रातील राड्याचा पाडा हद्दीत बिबट्याने तरुण शेतकऱ्यावर हल्ला करत त्याचा फडश्या पाडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शेतकऱ्याने बिबट्याशी दोन हात करत जीवाची बाजी लावून झुंज (Farmers Fight with Leopard) दिली. मात्र, बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी झाला. मंगेश मोरे (Mangesh More) असे बिबट्याशी झुंज देऊन बचावलेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.
जंगलात भक्ष मिळत नसल्याने बिबट्याचा मानवी वस्तीत शिरकाव शहापूर तालुक्यातील विहीगाव, कसारा वनपरिक्षेत्रातील राड्याचा पाडा येथे मंगेश कुटंबासह राहतो. सोमवारी सायंकाळी चार वाजल्याच्या सुमारास मंगेश आपल्या शेतातील वरई कापनी करून घरी जात होता. त्याच सुमाराला अचानक मंगेशवर बिबट्याने हल्ला केला. मात्र मंगेशने जवळच असलेल्या काठीच्या मदतीने त्या बिबट्याचा जोरदार प्रतिकार करत त्याला पळून लावले. मात्र, मंगेशच्या अंगावर बिबट्याचे नखांच्या जखमा झाल्या आहेत. दुसरीकडे जंगलात भक्ष मिळत नसल्याने व वन विभागाचे (Thane forest department) अधिकाऱ्यांची दुर्लक्ष होत असल्याने बिबट्या मानवी वस्तीत शिरकाव करत असल्याच्या घटना तालुक्यात घडत असल्याचा आरोप गावकरी करीत आहेत.
दोन दिवसांपूर्वीच आमदारांच्या गावातही बिबट्याचा संचार वाशाळा वनपरिक्षेत्र हद्दीतील साकडबाव, कोठारे जंगलात दोन दिवसांपासून बिबट्याचा संचार वाढला आहे. विशेष म्हणजे शहापूरचे आमदार दौलत दरोडा (Daulat Daroda) यांचे कोठारे गाव असून याच गावातील एका शेतकऱ्याचे गाईचे वासरू गावा जवळील जंगलात बिबट्याने फस्त केल्याने बिबट्याचा या भागात वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. एप्रिल महिन्यात साकडबाव जंगलाजवळील डोळखांब वनहद्दीतील रानविहारच्या जंगलात बिबट्याने किसन काळूराम खाकर यांच्यावर हल्ला करुन त्याला गंभीर जखमी केले होते. दोन शेळ्या बिबट्याच्या तावडीत सापडल्याने किसन थोडक्यात बचावला होता. आता दोन दिवसांपूर्वीच पुन्हा साकडबाव, कोठारे सर्वाधिक आदिवासी वस्ती असलेल्या डोंगराळ भागात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
शेतकऱ्यांना काळजी घेऊन जंगल परिसरात जाण्याच्या सूचना या बाबत आमदार दरोडा यांच्याशी संर्पक साधला असता, कोठारे हे आपले जन्मगाव असून या भागात बिबट्याचा संचार वाढला आहे. वनाधिकारी यांची या भागात गस्त वाढविली आहे. शेतकऱ्यांना काळजी घेऊन शेत, जंगल परिसरात जाण्याच्या सूचना केल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. तर विभागीय वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल घोगडे, यांच्याशी संपर्क साधला असता, बिबट्याचा संचार असल्याने शेतकऱ्यांनी काळजी घेऊन परिसरात वावर ठेवावा. रात्रीच्या वेळेत घर, पशुधन असलेल्या घर, गोठ्याचे दरवाजे काळजीपूर्वक बंद करावेत. बिबट्यापासून नागरी वस्तीला धोका होणार नाही याची वनविभागाकडून घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले.