ठाणे - पश्चिम मुंबई उपनगरात कांदिवली पोलीस ठाणे आणि खार पोलीस ठाण्यामध्ये बोगस लसीकरण करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली होती. याच टोळीने श्रीजी आरकेड येथील रेन्यूबाय डॉट कॉम या कंपनीतील कर्मचाऱ्यांना कोव्हीशिल्ड लस म्हणून चक्क पाण्याचे इंजेक्शन दिल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी कंपनीने नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल गेला आहे. हिरानंदानी सोसायटीतील नागरिकांना बनावट कोरोना लस आणि प्रमाणपत्र देऊन पैसे उकळण्याचा प्रकार समोर आला होता. त्याचनंतर ही बोगस लसीकरण करणारी टोळी मुंबईसह ठाण्यातही सक्रिय झाल्याचे चित्र दिसत आहे.
कोव्हीशिल्ड लस म्हणून दिले पाणी -
नौपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत श्रीजी आरकेड येथे रेन्यूबाय डॉट कॉम नामक एका कंपनीचे कार्यालय आहे. या कंपनीच्या व्यवस्थापनाने स्वखर्चाने आपल्या कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार कंपनीने हे काम महेंद्र सिंग, श्रीकांत माने, संजय गुप्ता, सीमा आहुजा, करीम यांना सोपवले होते. या टोळीने कोव्हीशिल्ड लस असल्याचे भासवून कंपनीच्या कर्मचाऱ्यांना चक्क पाणी असलेले इंजेक्शन दिले. इतकेच नव्हे तर लस घेण्याऱ्या कर्मचाऱ्यांना बोगस प्रमाणपत्र देखील दिले. हिरानंदानी सोसायटी बनावट कोरोना लस प्रकरणानंतर पोलीस तपासादरम्यान अश्याचप्रकारचे बोगस लसीकरण येथेही झाल्याचे उघडकीस आले आहे.
एका महिन्यापूर्वीचा प्रकार -
हा सारा प्रकार २६ मे २०२१ रोजी घडला. त्यानंतर रेन्यूबाय डॉट कॉम या कंपनीचे क्लस्टर सेल मॅनेजर उर्णव हिरालाल दत्ता यांनी बोगस लस टोचणाऱ्या टोळी विरोधात नौपाडा पोलिसात तक्रार दाखल केली. नौपाडा पोलिसांनी या प्रकरणी २५ जून रोजी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. .
एक हजार रुपयाला दिले इंजेक्शन -
या लसीकरणात आरोपींनी नागरिकांना एक हजार रुपये आकारात लसीकरण म्हणून चक्क पाण्याचे इंजेक्शन दिले आहे. अशा प्रकारे फसवणूक करत बोगस सर्टिफिकेटही देण्यात आले आहे.
हेही वाचा - Vaccine Scam मुंबईच्या हिरानंदानी सोसायटीत रहिवाशांना दिली बनावट लस? पोलीस तक्रार दाखल