नवी मुंबई - अवाजवी वीजबिल आकारण्यात आल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संताप व्यक्त करत वीजबिलाची हंडी फोडली. तसेच वाशीतील महावितरणच्या कार्यालयाची मनसेच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली. नवी मुंबईत मनसेने शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या नेरुळ येथील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
महावितरण विभागाकडून ग्राहकांना पाठवण्यात आलेल्या वाढीव वीज बिलांबाबत मनसेने कार्यकारी अभियंत्यांना जाब विचारत चांगलेच धारेवर धरले होते. त्यावेळी ग्राहकांना सुधारित वीजबिले पाठवून त्यामध्ये ५० टक्के सवलत देण्यात यावी, तसेच ग्राहकांचा वीजपुरवठा कोणत्याही प्रकारे खंडित करू नये, अशी मागणी यावेळी मनसेकडून करण्यात आली होती. तसेच तसे न झाल्यास महावितरण कंपनीच्या कार्यालयाची वीज कापण्याचा इशारा मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी दिला होता.
तक्रार प्राप्त झाल्यानंतर आठ दिवसांत ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण तसेच ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत करणार नसल्याचे आश्वासन महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी मनसेच्या शिष्टमंडळाला यावेळी दिले होते. मात्र, त्याची पूर्तता न झाल्याने वाशी येथील महावितरणाच्या कार्यालयात जाऊन बिलाची हंडी फोडत मनसे कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयाची तोडफोड केली. वीज बिल तक्रारीचे निवारण न झाल्यास मनसेच्या माध्यमातून महावितरण कार्यालयाची आम्ही तोडफोड करू, असा इशारा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना राज ठाकरे यांनी पत्र लिहून दिला होता. त्यानुसार आम्ही महावितरण कार्यलय फोडले, अशी माहिती मनसेचे निलेश बाणखेले यांनी दिली.