ठाणे - दिवसभर सिग्नलवर हार, फुले, गजरे बनवून विकायचे, मिळेल ते खायचे, अन् रात्री आभाळाचे पांघरून करून रस्त्याच्या कडेलाच झोपायचे, कसले सोशल डिस्टंन्सिंग आणि कसले मास्क, अहो इथे आंघोळीचा पत्ता नाही तिथे हात सतत धुण्याचा प्रश्नच नाही. पण तरीही कोणता आजार नाही की कोरोनाची भीती देखील नाही. ठाण्याच्या एका टोकाला घोडबंदर सारख्या पॉश परिसराला कोरोनाने विळखा घातला असताना, शहराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या तीन हात नाका येथे गेल्या अनेक वर्षांपासून डेरेदाखल असलेल्या गरीब आसरेकरूंची ही काहाणी.
तीन हात नाका सिग्नल म्हणजे अनेक गरीब कुटुंबांचे पोट भरण्याचे हक्काचे ठिकाण, येथे गेल्या अनेक वर्षांपासून 10 ते 12 कुटुंब वास्तव्यास आहेत. ते कधी भीक मागून जगतात, तर कधी छोट्या-मोठ्या वस्तुंची विक्री करून मिळालेल्या पैशातून आपला उदरनिर्वाह करतात. यातील अनेक कुटुंब फुटपाथवर गजरे विकण्याचे काम करतात.
कोरोनाची भीत वाटत नाही
दरम्यान त्यांना देशभरात थैमान घातलेल्या कोरोना महामारीबद्दल विचारले असता, आमची आदिवासी भटकी जमात, आम्हाला न गावी घर न शहरात राहायची सोय. जे मिळेल ते खायचे आणि आहे त्या परिस्थितीत जगायचे एवढंच ठरलेलं. परिस्थितीशी जुळून घेणे आमच्या रक्तातच आहे त्यामुळे कोरोनाची भीती वाटत नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
ठाणेकरांचे मानले आभार
दरम्यान आम्ही गावी देखील जाऊ शकत नाही, गावातील लोक आम्हाला सुखाने जगू देणार नाहीत. त्यामुळे आता ठाणे हेच आमचे घर आहे. अनेक नागरिक आम्हाला कठीण परिस्थितीमध्ये मदत करत असतात. मुलांसाठी पालिकेने सिग्नल शाळा सुरू केली आहे, त्या शाळेत आमची मुले जातात, त्यामुळे आम्ही ठाणेकरांचे आभारी आहोत अशी भावना देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.
हेही वाचा - कोविड कोचमध्ये उपचार सुरु; रुग्णांनी अनुभवला रेल्वेतील उपचार