ठाणे - महानगरपालिका आयुक्त विपीन शर्मा यांनी अनधिकृत बांधकाम आणि अनधिकृत अतिक्रमणांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. मात्र, असे असतानाही ठाणे महानगरपालिकेचा अतिक्रमण विभाग अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचे समोर आले आहे. ठाणे महानगरपालिकेपासून काही अंतरावर असलेल्या पाचपाखाडी भागातील उदय नगरच्या मोकळ्या जागेत अनधिकृत गाळे बांधून त्याठिकाणी टू व्हीलरचे सर्व्हिस सेंटर उभारण्यात आले आहे.
याबाबत अनेक तक्रारी महापालिकेत करण्यात आल्या आहेत. या तक्रारींची दखल घेत उथळसर प्रभाग समितीचा अतिक्रमण विभाग कारवाईसाठी पोहचला. मात्र, थातुरमातुर कारवाई करून ते त्या ठिकाणाहून निघून गेले. कारवाईसाठी पोहचलेल्या अतिक्रमण विभागाने केवळ फोटो-शुटिंग घेण्यासाठी गाळ्यातील फक्त दोन लाद्या तोडल्या व त्यानंतर कारवाई थांबवली. गाळे बंद करून त्याठिकाणाहून अतिक्रमण विभाग निघून गेला. स्थानिक लोकप्रतिनिधींचा या अनधिकृत बांधकामावर वरदहस्त आहे का? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. तर अशा तात्पुरत्या कारवाईमुळे महानगरपालिकेचा अतिक्रमण विभाग संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
महानगरपालिका अधिकारी संगनमतात सहभागी -
या कारवाईत ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी अवैध बांधकामाच्या मागे असल्याने दिखाऊ कारवाई करून कर्मचारी निघून गेले, अशी नागरिकांची तक्रार आहे. हा प्रकार कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाला आहे. या ठिकाणी अगोदरसुद्धा ठाणे महानगरपालिकेने कारवाई केली होती. तरीही पुन्हा याच जागी दुकाने सुरू करण्यात आली. अधिकाऱ्यांचा पाठींबा असल्यानेच हे झाले, असेही नागरिकांचे म्हणणे आहे.
पालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर अवैध बांधकाम -
ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त विपिन शर्मा यांच्या आदेशाला हरताळ फासत पालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर अवैध बांधकाम उभे राहिले आहे. तरी देखील ही थातूर मातूर कारवाई करण्यात आली.