कल्याण ठाणे २२०/२२ केव्ही नालासोपारा ईएचव्ही उपकेंद्राला वीजपुरवठा करणाऱ्या महापारेषण व पॉवर ग्रीडच्या दोन अतिउच्चदाब वीजवाहिन्यांमध्ये बिघाड झाल्याने गुरुवारी (१ सप्टेंबर) वसई-विरारमधील महावितरणच्या काही भागात वीजपुरवठा बाधित झाला. महापारेषणच्या अतिउच्चदाब वाहीनीवरील दुरुस्तीनंतर सायंकाळी सव्वासहा ते साडेसहा दरम्यान बाधित सर्वच भागाचा वीजपुरवठा पुर्ववत करण्यात आला आहे.
अतिउच्चदाब वाहिन्यांचा वीजपुरवठा खंडित नालासोपारा ईएचव्ही उपकेंद्राला वीज पुरवणाऱ्या महापारेषणच्या पडघा २२० केव्ही ईएचव्ही वाहिनीवर सकाळी ११ वाजून ५८ मिनिटाला बिघाड झाला. तर याच उपकेंद्राला वीजपुरवठा करणाऱ्या बोईसर येथून येणाऱ्या पॉवर ग्रीडच्या २२० केव्ही ईएचव्ही वाहिनीवर रात्री १२ वाजून ५५ मिनिटांनी बिघाड उद्भवला होता. नालासोपारा ईएचव्ही उपकेंद्राला वीजपुरवठा करणाऱ्या दोन्ही अतिउच्चदाब वाहिन्यांचा वीजपुरवठा खंडित झाला. परिणामी महावितरणच्या २२ केव्ही वाहिन्यांवरील ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित झाला. महापारेषण व पॉवर ग्रीडच्या वाहिन्यांमध्ये झालेल्या बिघाडामुळे १८५ मेगावॉटचा भाग बाधित झाला. शक्य असलेल्या ठिकाणी पर्यायी मार्गांचा वापर करून ८१ मेगावॉट वीजपुरवठ्याचा भाग सुरळीत करण्यात आला. परंतू इतर पर्याय नसल्याने १०४ मेगावॉट वीजपुरवठ्याचा भाग दुरुस्तीपर्यंत बाधित राहिला. महापारेषण व पॉवर ग्रीडच्या वाहिन्यातील बिघाडामुळे महावितरणचे पारोळ, नारंगी, म्हाडा, गवराई, नाईकपाडा आणि पोमण या सहा स्विचिंग स्टेशनवरील ३६ वाहिन्यांचा वीजपुरवठा बाधित झाला. तर १ हजार ४८७ रोहित्रांवरील ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित झाला.