ठाणे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शक्तीप्रदर्शनाने शनिवारी नवी मुंबईतील ऐरोली व बेलापूर या मतदारसंघात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या. सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी पावसात रोड शो, रॅली आणि सभांच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत प्रचाराचा शेवटचा दिवस चांगलाच गाजवला. विधानसभेसाठी 21 ऑक्टोबरला मतदान होणार असल्याने सर्वच पक्षाच्या उमेदवारांना धाकधूक आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी गेल्या महिनाभरापासून सर्व पक्षीय उमेदवारात प्रचाराची धामधूम सुरू होती. सुरुवातीला धिम्या गतीने सुरू असणारा प्रचार मतदानाला 3-4 दिवस राहिल्यानंतर जोरदारपणे सुरू झाला. छोट्या स्वरुपात प्रचारसभा, मोठ्या सभा, रोड शो, रॅली, पदयात्रा आणि वैयक्तिक भेटी यावर नवीमुंबईतील सर्वच उमेदवारांनी जोर दिला होता. बडे राजकीय नेते आणि सेलिब्रिटींना आपल्या मतदारसंघात आणून अनेक उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन केले होते.
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर शक्तिप्रदर्शन करत सर्वच उमेदवारांनी मतदारसंघ पिंजून काढले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भरपावसात सभा घेऊन मतदारांशी संवाद साधला. पाऊस सुरू असूनही सर्व पक्षीय नेते आणि उमेदवारांनी पावसाची तमा न बाळगता प्रचार सुरूच ठेवला. नुकताच भाजपवासी झालेले ऐरोली मतदार संघाचे उमेदवार गणेश नाईक यांच्या रोड शोमध्ये चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते, तर राष्ट्रवादीचे बेलापूर मतदारसंघाचे उमेदवार अशोक गावडे यांच्या रोड शोमध्ये झी मराठी वरील सुप्रसिद्ध मालिकेमधील आज्या, टॅलेंट, भैय्यासाहेब विक्या, राहुल्या ही पात्र साकारलेले कलाकार सहभागी झाले होते.
हे वाचलं का? - वरळी मतदारसंघात चार कोटींची संशयास्पद रक्कम जप्त
कोणा कोणात होणार अटीतटीची लढत -
बेलापूर मतदारसंघात महायुतीच्या मंदा म्हात्रे, महाआघाडीचे अशोक गावडे व मनसेचे गजानन काळे यांच्यात तिहेरी लढत होणार आहे. ऐरोली मतदार संघात महायुतीचे गणेश नाईक, महाआघाडीचे गणेश शिंदे, मनसेचे निलेश बाणखेले व वंचित आघाडीचे डॉ. प्रकाश ढोकने यांच्यात चौरंगी लढत होणार आहे.
हे वाचलं का? - किमान बहिण-भावाच्या पवित्र नात्याचा तरी आदर ठेवावा; 'त्या' वक्तव्याबाबत धनंजय मुंडेंचे स्पष्टीकरण
सुमारे ८ लाखांपेक्षा अधिक मतदार नवी मुंबई शहरात असून ऐरोली मतदारसंघात 4 लाख 61 हजार 349 इतके मतदार आहेत. बेलापूर मतदार संघात 3 लाख 85 हजार 885 इतके मतदार आहेत. नवी मुंबईत प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून 21 ऑक्टोबरला मतदारांचे भवितव्य मतपेटीत कैद होणार आहे. नवी मुंबईतील मतदाता कोणाला कौल देतो? हे पाहणे खरोखरच औत्सुक्याचे ठरणार आहे.