ठाणे - शिक्षणात अडथळा ठरत असल्याच्या रागातून एका अकरा वर्षीय शाळकरी मुलीने आपल्या २ वर्षीय बहिणीवर चाकूने गळ्यावर व पोटावर सपासप वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. हा धक्कादायक प्रकार भिवंडी तालुक्यातील दापोडे गावातील हरिहर कंपाऊंड परिसरात घडला आहे.
पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून अल्पवयीन अकरा वर्षीय बहिणीला ताब्यात घेतले आहे. हल्ला झालेली मुलगी आईवडील, एक मोठी बहीण व भाऊ आदींसोबत राहत आहे. तिची मोठी बहीण पाचवीच्या वर्गात शिकत होती. मात्र, तिला लहाण बहिणीला सांभळावे लागत असल्याने शाळेला मुकावे लागत होते. त्यामुळे तिच्या मनात लहाण बहिणी विषयी राग निर्माण झाला होता. त्यामुळे तिने तिला कायमचे संपवण्याचा निर्णय घेतला. आईवडील शनिवारी सकाळी कामावर गेले होते. त्यावेळी ती लहाण भाऊ व बहिणीसोबत घरात होती. यावेळी तिने घराची आतून कडी लावून भाजी चिरण्याच्या धारदार चाकूने लहाण बहिणीच्या गळ्यावर व पोटावर सपासप वार करून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा - ठाण्यात पुन्हा खड्ड्याने घेतला माय-लेकीचा बळी ; खड्डा चुकवताना झाला अपघात
या घटनेनंतर मोठ्या बहिणीने स्वतः च्या तोंडाला रुमाल बांधून अन्य कोणीतरी लहाण बहिणीला घरात घुसून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. तिची आई ही सायंकाळी कामावरून घरी परतल्यावर ही गंभीर घटना समोर आली. या घटनेचा गुन्हा नारपोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - अंगाला हळद लागण्यापूर्वीच रस्त्यांवरील खड्ड्यांनी घेतला डॉक्टर तरुणीचा बळी
पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासाची चक्रे फिरवली. जखमी मुलीच्या भावाची कसून चौकशी केली असता त्यने मोठ्या बहिणीने चाकूने वार करून लहाण बहिणीला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. त्यामुळे रात्री उशिराने पोलिसांनी मोठ्या बहिणीला ताब्यात घेऊन तिच्याकडे चौकशी केली असता लहाण बहिणीमुळे मला शाळेत जाता येत नसल्याने तिला ठार मारण्याचा मी निर्णय घेतला, अशी कबुली दिली आहे. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन बाल न्यायालयात हजर केले असता तिची रवानगी बालसुधारगृहात केली आहे.