ठाणे - आपण परदेशात जातो, तीन-चार दिवस झाले की भाकरीची ओढ लागते. पण तिकडे भाकरी मिळत नाही. मात्र सोलापूरची कडक भाकरी सहा महिने टिकते. त्यामुळे ही कडक भाकरी-शेंगाची चटणी आणि त्यासोबतच 'सोलापूर फेस्ट' सातासमुद्रापार जाईल, असा विश्वास शिवसेना नेते, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम व आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. सोलापूर सोशल फाउंडेशन आयोजित सोलापूर फेस्टच्या उद्घाटनप्रसंगी शिंदे बोलत होते.
ढोकळीच्या हायलँड मैदानावर सोलापूर फेस्ट येत्या रविवारपर्यंत सुरू राहणार असून १५० उत्पादनांसह उद्योजक या फेस्टमध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे शेंगा चटणी, कडक भाकरी, लांबोटीचा चिवडा, हुग्गी (गव्हाची खीर) या चटकदार खाद्य पदार्थांचा आस्वाद व जग प्रसिद्ध सोलापूरची चादर, सतरंजी, हातमागावरील साड्या अशा वस्तूंची एकाच छताखाली खरेदी करण्याची संधी ठाणेकरांना मिळणार आहे.
सोलापुरातील प्रत्येक उत्पादनांना बाजारपेठ मिळावी, यासाठी राज्यभरात विविध ठिकाणी राज्याचे सहकार व पणनमंत्री, सोलापूर सोशल फाउंडेशनचे प्रमुख सुभाष देशमुख यांच्या संकल्पनेतून सोलापूर फेस्ट प्रदर्शन आयोजित केले जाते. त्यातून सोलापुरातील स्थानिक व्यापाऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी तसेच येथील उत्पादनांना राज्यपातळीवर बाजारपेठ उभी करण्यासाठी या फेस्टचे आयोजन करण्यात आले. यापूर्वी पुणे व नवी मुंबईच्या फेस्टचा अभूतपूर्व प्रतिसाद पाहता ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात या फेस्टचे आयोजन करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार त्यांच्या विनंतीला मान देत शहरात सोलापूर फेस्ट सुरू आहे.
कोणतेही काम करण्यासाठी संकल्प, मेहनत आवश्यक आहे. सोलापूर जिल्ह्याची प्रतिमा दुष्काळी असूनही अनेक सकारात्मक बाबी देशासमोर मांडण्यासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख हे काम करत असल्याचे मत शिंदे यांनी उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले. तसेच अवघ्या काही दिवसातच इतक्या भव्यदिव्य फेस्टचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी सोलापूर सोशल फाउंडेशनच्या प्रतिनिधींचे कौतुक केले.
यावेळी सहकार मंत्री सुभाष देशमुख, आमदार निरंजन डावखरे, भाजप शहराध्यक्ष संदीप लेले, किसनराव राठोड, बाळासाहेब निंबाळकर, पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, संचालक अभिजित पाटील, पूर्वा वाघमारे, प्रसिद्ध अभिनेते राहुल सोलापूरकर, रवींद्र मिणीयार, विशाल निंबाळकर आदी उपस्थित होते. खासदार राजन विचारे, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह हजारो ठाणेकरांनी पहिल्याच दिवशी फेस्टला गर्दी करुन अभूतपूर्व प्रतिसाद दिला. यावेळी पुरुषोत्तम राजिरामवाले, विकास डोंगरे, बाळासाहेब झांबरे यांना 'श्रीमंती सोलापूरची' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.